वृत्तसंस्था/ साखिर, बहरिन
या वर्षीच्या फॉर्म्युला वन मोटर शर्यतींना प्रारंभ झाला असून रविवारी येथे झालेल्या बहरिन ग्रां प्रि या मोसमातील पहिल्या शर्यतीत मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने पहिले स्थान मिळवित नव्या मोसमाची विजयी सुरुवात केली. त्याला रेड बुलचा युवा ड्रायव्हर मॅक्स व्हर्स्टापेनकडून कडवी लढत मिळाली. हॅमिल्टनचा संघसहकारी व्हाल्टेरी बोटासने तिसरे स्थान मिळविले.
सातवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या मर्सिडीजच्या हॅमिल्टनने केवळ एका सेकंदाच्या आतील फरकाने रेड बुलच्या व्हर्स्टापेनला मागे टाकत चेकर्ड फ्लॅग मिळविला. अंतिम टप्प्यात व्हर्स्टापेनने हॅमिल्टनवर खूपच दडपण आणले होते. शेवटच्या चार लॅप्स असताना व्हर्स्टापेनने हॅमिल्टनला मागे टाकत आघाडी घेतली, पण असे करताना त्याची गाडी ट्रकची मर्यादा सोडून वाईड गेल्याने त्याला मिळालेली आघाडी गमवावी लागली. यानंतर त्याला दुसरी संधी मिळू शकली नाही. तीन सराव सत्रातही व्हर्स्टापेनने आघाडीचे स्थान मिळवित पोल पोझिशन मिळविले होते आणि तोच जेतेपदाचा दावेदार असल्याचे मानले जात होते. त्याने जर चूक केली नसती तर या शर्यतीत तोच विजेता ठरला असता, असे हॅमिल्टनही नंतर म्हणाला. हॅमिल्टनचे हे कारकिर्दीतील 96 वे विक्रमी विजेतेपद आहे. त्याने येथील जेतेपदाचे 25 गुण मिळविले. रेड बुलच्या व्हर्स्टापेनने दुसरे (18 गुण), मर्सिडीजच्या बोटासने तिसरे (16 गुण), मॅक्लारेनच्या नोरिसने चौथे (12 गुण), रेड बुलच्या पेरेझने पाचवे (10 गुण), फेरारीच्या लेक्लर्कने सहावे (8 गुण), मॅक्लारेनच्या डॅनियल रिकार्दोने सातवे (6 गुण), फेरारीच्या कार्लोस सेन्झने आठवे (4 गुण), अल्फा टॉरीच्या वाय. त्सुनोदाने नववे (2 गुण) व ऍस्टन मार्टिनच्या एल. स्ट्रोलने दहावे (1 गुण) स्थान मिळविले. किमी रायकोनेन, फर्नांडो अलोन्सो, सेबॅस्टियन व्हेटेल, जी. रसेल या नामांकितांना तसेच मायकेल शुमाकरचा मुलगा मिक शुमाकर यांना गुण मिळविण्यात अपयश आले.









