बेळगाव :\ प्रतिनिधी
मध्यवर्ती बसस्थानकात पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मध्यवर्ती बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य या मथळय़ाखाली तरुण भारतमधून वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने दखल घेत बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ खडी टाकून मार्ग सुरळीत केला. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे सोयीस्कर झाले आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात नवीन स्मार्ट बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बसस्थानक उभारण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी सोयीपेक्षा असुविधाच अधिक असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथून ये-जा करणे अडचणीचे बनले होते. त्याबरोबरच आवारात जागोजागी खड्डे पडल्याने पाण्याची डबकी निर्माण झाली होती. यातून मार्ग काढताना प्रवाशांची कसरत व्हायची. यावेळी एखादी बस गेल्यास गढूळ पाणी प्रवाशांच्या अंगावर उडण्याचे प्रकार घडत होते. याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ खडी टाकून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला. त्यामुळे प्रवाशांबरोबर बसेसनाही सोयीस्कर झाले आहे. सध्या केवळ प्रवेशद्वाराजवळ खडी टाकून मार्ग सुरळीत केला असला तरी बसस्थानकाच्या संपूर्ण आवारात डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
लॉकडाऊनमुळे दोन महिने बससेवा बंद होती. त्यामुळे परिवहनला मोठा फटका बसला आहे. अद्यापही प्रवाशांचा प्रतिसाद कमीच असल्याने परिवहन अडचणीत आले आहे. शासनाने कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी रविवारबरोबर आता शनिवारीही सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय कार्यालये बंद असली तरी बससेवा मात्र दर शनिवारी सुरूच राहणार आहे. दि. 2 ऑगस्टपर्यंत फक्त दर रविवारी बससेवा बंद राहणार आहे. शनिवारी शासकीय कार्यालये बंद असल्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ कमी असलेली पाहायला मिळाली. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या परिवहनला फटका बसला.









