प्रतिनिधी/ बेळगाव
एकीकडे मध्यवर्ती बसस्थानकात सुसज्ज असे स्मार्ट बसस्थानक उभारून विकास साधला जात आहे तर दुसरीकडे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या बसस्थानकात सुविधांपेक्षा असुविधांचा सामना अधिक करावा लागत आहे. बसस्थानकात आसनांची दुर्दशा झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
सर्व व्यवहार आणि बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय सुरळीत सुरु झाल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र बसस्थानकात आसनांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना बाहेर भर उन्हात थांबावे लागत आहे. आसनांचीदेखील दुर्दशा झाल्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे. परिवहनने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
तात्पुरत्या बसस्थानकात आसनाअभावी प्रवाशांना बसथांबा सोडून बाहेर थांबावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण होत आहे. तसेच अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाल्याने आसने धुळीने माखली आहेत. शिवाय प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची संख्या वाढली असली तरी आसने कमी पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.









