मध्यवर्ती बसस्थानकातील प्रकार, प्रवाशांतून नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
सतत हजारो प्रवाशांनी गजबजणाऱया मध्यवर्ती बसस्थानकात सुविधांपेक्षा प्रवाशांना अनेक असुविधांचाच सामना करावा लागत आहे. बसस्थानकात पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय व इतर सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिलांची हेळसांड होताना दिसत आहे. अनलॉकपासून बससेवेबरोबरच प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र प्रवाशांना थांबण्यासाठी बसथांबे अपुरे पडत असल्याने उन्हात ताटकळत थांबावे लागत आहे.
विविध मार्गांवर सर्व प्रकारची बससेवा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र प्रवाशांना बसथांब्यांअभावी उन्हात थांबावे लागत आहे. तर काही बसथांब्यांची दुर्दशा झाल्याने प्रवाशांना बसथांब्यावर बसणेदेखील कठीण झाले आहे. बसस्थानकात अपुरी आसन व्यवस्था असल्याने प्रवाशांना बाहेर ताटकळत थांबावे लागत आहे.
दरम्यान बसची ये-जा देखील सुरू असल्याने प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान लांबपल्ल्याच्या आणि स्थानिक बस एकाच ठिकाणी थांबविल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत आहे. यामुळे बसस्थानकात बसथांबे उपलब्ध करावेत, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.









