बलरामदादांचे मिथिला नगरीत आगमन झालेले आहे हे समजताच मिथिला नरेशाला मनापासून आनंद झाला. तो धावतच पुढे आला व त्याने बलरामदादांचे उत्साहाने प्रेमादरपूर्वक स्वागत केले. त्याने स्नेहाने त्यांना आलिंगन दिले. त्यांना दिव्यासनावर बसविले व ईश्वरभावनेने त्यांची यथासांग पूजा केली. दोन्ही कर जोडून तो बलरामदादांपुढे उभा राहिला.
आजि सुकृता आलें फळ । आजि पावन जालें कुळ। आजि उद्धरले पूर्वज सकळ । श्रीपदकमळ वंदिलिया । इतुकें प्रार्थितों विनीत चित्तें । कृपा केली जरी समर्थें। कांहीं दिवस राहोनि येथें । वचनामृतें निववावें । हें ऐकोनि संकर्षण । परमानंदें वोसंडून। म्हणे विदेहा जिवलगप्राण । तुजविण आन मज नाहीं।
तो बलरामदादांना म्हणाला-आज माझे सुकृत फळाला आले. आपल्या पायांना वंदन करायला मिळाल्याने आज माझे कुळ पावन झाले. माझ्या पूर्वजांचा उद्धार झाला. माझी एवढीच प्रार्थना आहे आता आपण काही दिवस इथेच वास्तव्य करावे व आम्हाला आपल्या वचनामृताचा लाभ द्यावा. त्यावर बलरामदादा आनंदून म्हणाले- हे विदेहा! तुझ्याशिवाय मला जीवलग मित्र कोण आहे? तुझ्या इच्छेप्रमाणे होईल.
तिये मिथिलेच्या ठायीं बळ । राहिला होत्साता निश्चळ । जनकसंगें क्रमिला काळ । कित्तेक वर्षेंपर्यंत। षड्गुणैश्वर्यसंपन्न । विभु समर्थ संकर्षण। आला मिथिलेस हें ऐकोन । स्वयें दुर्योधन पातला। बैसोनि जनकाचिये सदसीं । रामा गुरुत्वें उपासी। होऊनियां अंतेवासी । स्वयें अभ्यासी गदायुद्ध । करूनि जनकाचा सहवास । रामापासीं गदाभ्यास । दुर्योधनें सावकाश । केला विशेष कौशल्यें ।
बलरामदादा आपला मित्र विदेही जनकाच्या सान्निध्यात मिथिला नगरीत बराच काळ वास्तव्य करून होते. षडगुणसंपन्न बलरामदादा मिथिला नगरीत निवास करून आहेत ही वार्ता दुर्योधनाने ऐकली. तो स्वतः मिथिला नगरीत आला. बलरामदादांचे शिष्यत्त्व पत्करून त्याने त्यांची सेवा केली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली गदाविद्येचा अभ्यास केला. गदायुद्धात विशेष कौशल्य प्राप्त केले.
गरुडध्वज रथेंसहित । द्वारके येऊनि जगन्नाथ ।
शतधन्व्याचा वृत्तान्त । कथिला समस्त सत्यभामे ।
परम प्रियकर सत्यभामा। तिचिया संतोषजननकर्मा । विभु समर्थ जो परमात्मा । स्वकृतकर्मा निरूपी । शतधन्व्याचा केला वध । त्यापें मणीचा करितां शोध । परंतु स्यमंत अलब्ध। ऐकोनि प्रुद्ध बळ जाला । आम्हांसि पाठवूनियां नगरा । राम गेला मिथिलापुरा । इत्यादि वचनीं वंचूनि दारा। करवी सत्कारा श्वशुराच्या । सत्राजित रहितपुत्र। यालागिं तत्क्रिया कमळामित्र । करविता जाला हें चरित्र । वदलें वत्र शुकाचें । सहित सपिंड सुहृद आप्त । तनुसंबंधी गोत्रें सप्त । साम्परायिकाक्रियाव्याप्त । ते ते समस्त मिळोनियां । पारलौकिक ऐसियापरी। सत्राजिताचे करवी हरि । तैसीच शतधन्व्याच्या घरिं । करिती जाली अंत्येष्टि ।
बलरामदादा मिथिला नगरीत वास्तव्यास असताना इकडे कृष्ण द्वारका नगरीत परतला. त्याने तातडीने सत्यभामेची भेट घेतली.
देवदत्त परुळेकर








