साताऱयात घडला आणखी एक फसवणूकीचा प्रकार
प्रतिनिधी/ सातारा
टाटा फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेला डंपर (क्रं.एम.एच. 50 एन. 1513) ची खोटी एनओसी बनवून कराड आरटीओ कार्यालयात ती सादर करून कर्जाचा बोजा कमी केला. त्यानंतर हा डंपर परस्पर विक्री केल्याने दत्तात्रय भास्कर इंगवले (वय 32, रा. रिसवड ता. कराड) यांच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.
फायनान्स कंपनीकडून हप्त्यावर घेतले ट्रक, टेम्पो या वाहनांचे हप्ते थकल्याने ही वाहने संबंधित मालकांना भेटून त्यांच्याकडून विकत घेत त्याची परस्पर विक्री करत फसवणूक करणारी टोळी जिल्हा पोलिसांनी जेरबंद केली आहे. हा गुन्हा उघडकीस येवून काहीच दिवस झाले असून असाच फायनान्स कंपनीकडून वाहन खरेदी करून त्यांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार सातारा शहरात घडला आहे. दत्तात्रय भास्कर इंगवले याने टाटा मोटर फायनान्स कंपनी शाखा सातारा यांच्याकडून सन 2019 साली डंपर (क्रं. एम.एच.50 एन.1513) हा घेण्यासाठी 34 लाख 63 हजार 923 रूपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे 8 हप्ते असे 8 लाख 69 हजार रूपये भरले. टाटा मोटर फायनान्स कंपनीच्या नावाची खोटी एनओसी तयार केली. कंपनीचा खोटा शिक्का, सही व आरटीओचा फार्म नंबर 35 खोटा तयार करून कराडच्या आरटीओ कार्यालयात दाखल केले. यामुळे डंपरवर असणारा कर्जाचा बोजा कमी होताच त्याने हा डंपर पुण्याचे बिपीन कुसाळे यांना परस्पर विकला.
याची माहिती फायनान्स कंपनीच्या अविनाश अशोक साळुंखे यांना कळताच त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दत्तात्रयवर गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होताच त्याला तात्काळ अटकही झाली आहे. या गुह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.