नवीन वर्षात भाजप राजकीयदृष्टय़ा जास्त आक्रमक बनून आपल्या विरोधकांचे भरीत करायला लागेल. एकीकडे आक्रमक भाजप तर दुसरीकडे कमजोर काँग्रेस अशा अवस्थेत धास्तावलेल्या विरोधी पक्षांना केवळ ऐक्मयाचीच नव्हे तर नवीन रणनीतीची जरुरी लागेल.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोदींनी जी बाजी लावली ती ते सपशेल हरले. त्या बलाढय़ राष्ट्राच्या निवडणुकीत जो बिडेन हे भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ‘अगली बार, ट्रम्प सरकार’ असा प्रचार करणारे तोंडावर आपटले.
याउलट भाजपला बिहारमधील सत्ताधारी रालोआमधील सर्वात मोठा पक्ष बनवून मोदींनी आपले नेतृत्व म्हणजे खणखणीत नाणे आहे हे परत एकदा दाखवले. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला तिसऱया स्थानावर ढकलून हे करण्यात आल्याने त्याचे पडसाद सर्वदूर उमटणार आहेत. बिहार हे आगळेवेगळे राज्य आहे. राजकीयदृष्टय़ा एवढे जागरुक राज्य दुसरे नसेल. अशा या राज्यात भाजपला अजूनपर्यंत एकदाही सत्ता मिळालेली नाही. बिहारच्या राजकारणातील चाणक्मय म्हणून ओळखल्या जाणाऱया नितीशकुमारांच्या दुय्यम भूमिका घेणे हे भाजपला भाग पडलेले आहे. आवडो नावडो पण लालू यादवांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपाला वेळोवेळी नितीशकुमारांची पालखी वहावी लागली आहे. भाजपबरोबर नितीश यांची कट्टी झाली तेव्हा लालू यादवांना त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवावे लागले. नेता म्हणून एक अजब रसायन असलेल्या नितीश यांचे राजकीय खच्चीकरण झाल्याशिवाय बिहारमध्ये नवी मांडणी नाही हे भाजप आणि राजदने ओळखले आहे.
नितीशकुमार यांना डिवचल्याने आता राजकारणदेखील ढवळले जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. निवडणुकीचे निकाल लागल्यावर नितीशनी दोन कृती केल्या. पहिल्या दिवशी हिंग कोर्टमधील मजारला चादर चढवली आणि दुसऱया दिवशी मौलाना आझाद यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रतिमेला हार घातला. नितीश यांच्यासारखे नेते विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या मुशीत तयार झालेले. एकीकडे भाजप आणि दुसरीकडे डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने पंतप्रधान बनलेल्या व्ही. पी. सिंग यांनी पैगंबराच्या जन्मदिनी सरकारी सुट्टी जाहीर करून भाजपाला पोटशूळ उठवला होता. आता भाजपच्या टेकूमुळे परत सत्तेवर येत असताना नितीश आपली सेक्मयुलर प्रतिमा अजून गडद करून आपण आज उद्या परत भाजप विरोधाचे राजकारण करू शकतो असा संकेत देत आहेत. चिराग पासवान यांचा वापर करून भाजपने आपला गेम केला हे न कळण्याइतके नितीश दूधखुळे नाहीत. आता चिरागला सत्ताधारी आघाडीतून काढण्याच्या मुद्यावर राजकारण हळूहळू तापणार आहे. ‘मी मोदींचा हनुमान आहे’ असा दावा करून चिरागने भाजपाला या लढाईत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ओढले आहे. नितीशच्या पक्षापेक्षा मोठे होऊनदेखील तेच मुख्यमंत्री होणार असे भाजपला म्हणावे लागत आहे यामागे मोदी आणि अमित शाह यांची मजबुरी आहे. नितीशना ज्या दिवशी पायउतार करायचा प्रयत्न भाजप करेल तेव्हा तेजस्वी यादव हे नितीशच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनतील वा लालू यादव अजून काही खेळ करतील ही भीती भाजपला आहे.
बंगाल आणि आसामसह पाच राज्यातील निवडणुका नवीन वर्षात होत असताना भाजपने मध्य प्रदेशसह विविध राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकात विजय पताका झळकावून आपल्या विरोधकांच्या पोटात गोळा आणला आहे. आता मध्य प्रदेश मध्ये भाजपची सत्तेवर पकड पक्की झाली आहे. दिग्विजयसिंग आणि कमल नाथ यांची राजकारणातील सद्दी संपली आहे. नेतृत्वाच्या प्रश्नावर संभ्रमात असलेल्या काँग्रेसचे चाक जमिनीत जास्तच रुतत चालले आहे हे भाजपने गुजरात मधील आठही पोटनिवडणुका जिंकून दाखवून दिले आहे. भाजपचे गुजरातमधील नवीन प्रमुख तर पुढील विधानसभा निवडणुकीत राज्यातील 182 पैकी 182 जागा जिंकण्यासाठी आतापासून कामाला लागले आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे सी आर पाटील हे गुजराती महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांना शहा यांचा उजवा हात मानले जाते. आता बिहारमधील काँग्रेस विधायक दलाला खिंडार पडायला वेळ लागणार नाही. अमित शहा अगोदरच या कामाला लागले आहेत अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू झाली आहे. बिहारमधील तेजस्वी यादवनी भाजपशी दिलेल्या कडव्या झुंजीतून समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव काय निष्कर्ष काढतील आणि लढाईला कसे सज्ज होतील त्यावर उत्तर प्रदेशमधील लढत कशी होईल ते अवलंबवून आहे. मायावतींचा बसप हा भाजपचा बी टीम झाला आहे हे दिवसेंदिवस प्रकर्षाने दिसून येत आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वद्रा हे ट्विटरपेक्षा जमिनीवरील लढाईत सक्रिय झाले तर काँग्रेसची उरलीसुरली जहागीर वाचवता येणार आहे.
नवीन वर्षात आता भाजप राजकीयदृष्टय़ा जास्त आक्रमक बनून आपल्या विरोधकांचे भरीत करायला लागेल. ममता बॅनर्जी आता फार काळ मुख्यमंत्री राहिल्या तर ते नवलच ठरेल. एकीकडे आक्रमक भाजप, दुसरीकडे कमजोर काँग्रेस अशा अवस्थेत धास्तावलेल्या विरोधी पक्षांना पुढील मार्गक्रमणा करण्यासाठी केवळ ऐक्मयाचीच नव्हे तर नवीन रणनीतीची जरुरी
लागेल.
सुनील गाताडे








