वृत्तसंस्था/श्रीनगर
काश्मीर खोऱयाच्या बडगाम जिल्हय़ात दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱयाचे अपहरण करून त्याची हत्या केली आहे. बुधवारी रात्री बंदुकीचा धाक दाखवून पोलीस कर्मचाऱयाचे अपहरण करण्यात आले. गुरुवारी सकाळी गावाबाहेरील शेतांमध्ये पोलीस कर्मचाऱयाचा मृतदेह सापडला आहे. संबंधित परिसरात पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. या गुन्हय़ात सामील दहशतवाद्यांविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांकडून केला जात आहे.
मागाम या गावचा रहिवासी असलेले मजीर राठर हे आयआरपीचे जवान होते. बुधवारी सुटीनिमित्त ते घरी परतले होते. रात्री घराबाहेर पडले असता दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. पोलिसांनी मजीर यांच्या शोधासाठी मोहीमही सुरू केली होती. बटपोरा भागातील शेतांमध्ये मजीर यांचा मृतदेह सापडला आहे. हत्या करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी मजीर यांचा अनन्वित छळ केल्याचेही समोर आले आहे.









