कोरोना ब्रेकनंतर प्रथमच सायना, सिंधू खेळताना दिसणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सायना नेहवाल व पीव्ही सिंधू कोरोनाच्या ब्रेकनंतर प्रथमच ऍक्शनमध्ये दिसणार असून बँकॉकमध्ये होणाऱया तीन स्पर्धांत त्या सहभागी होणार आहेत. थ्यात बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सचाही समावेश आहे.

ऑलिम्पिक पात्रतेचा विचार लक्षात घेत बीएआयने जानेवारीत होणाऱया या तीन स्पर्धांसाठी भारताचा आठ सदस्यीय बलाढय़ संघ निवडला आहे. त्यात पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, बी.साई प्रणीत, किदाम्बी श्रीकांत, सात्विकसाईराज रनकिरेड्डी, चिराग शेट्टी, अश्विनी पोनप्पा, एन.सिक्की रेड्डी यांचा समावेश आहे. यातील थायलंड ओपन ही पहिली स्पर्धा 12 ते 17 जानेवारी या कालावधीत होणार आहे. त्यानंतर टोयोटा थायलंड ओपन (19-24 जानेवारी) व प्रतिष्ठेची बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धा 27-31 जानेवारी या कालावधीत होणार आहे.
गेल्या मार्चमध्ये कोरोना महामारीचे संकट फैलावल्यानंतर जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धांना त्याचा फटका बसल्याने काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या तर काही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. या ब्रेकनंतर के.श्रीकांत वगळता भारताचे टॉपचे सर्व बॅडमिंटनपटू प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. माजी जागतिक अग्रमानांकित श्रीकांतने मात्र गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या डेन्मार्क ओपन स्पर्धेत भाग घेतला होता.
‘बॅडमिंटन पुन्हा एकदा कोर्टवर खेळताना पहावयास मिळणार आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. यापुढे हळूहळू सर्व स्पर्धा प्रत्यक्ष कोर्टवर होताना दिसणार आहेत. गेल्या सात-आठ महिन्यांत आमच्या अनेक खेळाडूंनी एकही स्पर्धा खेळलेली नाही. पण त्यांना आता पुनरागमन करता येणार आहे,’ असे बीएआयचे सरचिटणीस अजय सिंघानिया म्हणाले. ‘मात्र सर्वच खेळाडू क्षमतेनुसार शिबिरामध्ये कसून सराव करीत आहेत. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा लक्षात घेऊन आम्ही सर्वोत्तम संघाची निवड या स्पर्धांसाठी केली आहे. प्रत्यक्ष स्पर्धेत खेळण्याचा सराव त्यांना व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे,’ असेही ते म्हणाले.
एकेरीचे विदेशी प्रशिक्षक ऍगस डी. सँटोसो आणि पार्क ताय सँग तसेच दुहेरीचे प्रशिक्षक डी. क्रिस्तियावान साहाय्यक स्टाफसह संघासोबत जाणार आहेत. त्यात किरण छल्लागुंडला, जॉन्सन, इव्हानगेलिना, बादम, एम. श्रीकांत यांचा समावेश आहे.









