प्रेंच संरक्षण मंत्र्यांच्या भारत दौऱयाची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱयानंतर फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांचा दिल्ली दौरा अनेकार्थाने उपयुक्त ठरू शकतो. वेगाने बदलणाऱया जागतिक समीकरणांमुळे भारत आणि फ्रान्स यांच्यातील सहकार्य वाढत आहे. द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा देण्यासाठी प्रेंच संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले भारताच्या दौऱयावर आहेत. या दौऱयादरम्यान मेक इन इंडिया अंतर्गत बाराकुडा शेणीच्या आण्विक पाणबुडय़ांसाठी त्यांच्याकडून प्रस्ताव देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येतोय.
हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रात भारताला मिळत असलेले आवहन पाहता सैन्य उपकरणांप्रकरणी सर्वात मोठा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. या पाणबुडय़ांच्या माध्यमातून भारतीय नौदल हिंदी महासागरातील स्वतःची क्षमता आणखीन वाढवू शकतो. तसेच यांच्याद्वारे चीनच्या आव्हानाला सामोरे जाता येणार आहे. कुठल्याही देशासाठी आण्विक पाणबुडी तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे. अशास्थितीत तंत्रज्ञान हस्तांतरण अंतर्गत फ्रान्सने या पाणबुडय़ांची भारतात निर्मिती करण्याचा प्रस्ताव दिल्यास ते अत्यंत विशेष ठरणार आहे.
पहिल्यांदाच एखादा देश भारताला आण्विक पाणबुडीचे तंत्रज्ञान देणार आहे. यापूर्वी सोव्हियत संघाने दोनवेळा भारताला आण्विक पाणबुडय़ा भाडेतत्वावर दिल्या होत्या. तर भारताने रशियासोबत आण्विक पाणबुडय़ांच्या खरेदीसंबंधी करार केला आहे. यांतर्गत 2025 मध्ये भारताला रशियाकडून एक आण्विक पाणबुडी मिळणार आहे.









