एका व्यक्तीने थप्पड लगावली -सुरक्षा दलांकडून 2 जणांना अटक
वृत्तसंस्था / पॅरिस
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर मंगळवारी दुपारी ड्रोम क्षेत्रात हल्ला झाला आहे. मॅक्रॉन येथे लोकांना भेटत असताना एका व्यक्तीने त्यांना थप्पड लगावली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. लवकरच आणखीन काही जणांना अटक होऊ शकते. या घटनेची चित्रफितही समोर आली आहे.
संबंधित इसमाने अध्यक्षांवर हल्ला केला असता सुरक्षा रक्षकाने त्वरित त्याला पकडून जमिनीवर पाडले. मॅक्रॉन यांना या घटनेनंतर त्वरित दूर नेण्यात आले. मॅक्रॉन थप्पड लागली नसल्याचा दावा काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे.
चित्रफितीत मॅक्रॉन जमावाच्या जवळून जाताना दिसून येतात. लोक आणि त्यांच्यादरम्यान बॅरिकेड होते. यादरम्यान एक व्यक्ती त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. मॅक्रॉन त्याच्याजवळ जाताच तो व्यक्ती त्यांना थप्पड लगावतो. मॅक्रॉनच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला त्वरित ताब्यात घेतल्याचे चित्रफितीत दिसून येते.
पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी घटनेनंतर नॅशनल असेंबलीला याची माहिती दिली आहे. लोकशाहीचा अर्थ चर्चा आणि वादविवाद आहे. कुठल्याही प्रकरणात आमही हिंसेचे समर्थन करू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही आमच्या अध्यक्षांसोबत उभे आहोत असे उद्गार विरोधी पक्षनेते जीनलुक मॅल्कन यांनी काढले आहेत. अध्यक्षांच्या दौऱयाच्या काही दिवसांपूर्वीच या क्षेत्रात 7 महिन्यांनी बार आणि रेस्टॉरंट्स सुरू करण्यात आले होते. नाइट कर्फ्यूही संपविण्यात आला आहे.









