प्रतिनिधी /फोंडा :
नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांचा राजीनामा स्वीकृत झाल्याने फोंडा पालिकेला आता नवीन नगराध्यक्षांचे वेध लागले आहे. चतुर्थीनंतर लगेच नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता असल्याने सध्या भाजपा व मगो पक्षातर्फे मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. भाजपातर्फे तिघे दोवदार असून मगोची मूठ मात्र अद्याप झाकलेली आहे.
पंधरा सदस्यांच्या या पालिका मंडळावर सध्या भाजपाकडे आठ तर मगो पक्षाकडे सात नगरसेवकांचे संख्याबळ आहे. आमदार रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांच्यासह काँग्रेसमधील सर्व तिघाही नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने फोंडा पालिकेवरील काँग्रेसची भूमिका संपुष्टात आली आहे. त्यामुळे सत्तेच्या वर्तळात भाजपा विरुद्ध मगो असा थेट सामना आहे. सध्य स्थितीत भाजपाकडे आठ अधिकृत सदस्य असल्याने त्यांचेच पारडे जड दिसते. भाजपातर्फे रितेश नाईक, उपनगराध्य विश्वनाथ दळवी व फोंडा भाजपा मंडळाचे शांताराम कोलवेकर हे तिघे नगराध्यक्षपदाचे दावेदार आहेत. त्यापैकी दोघांची नाराजी दूर करुन एकाची निवड करण्याचे आव्हान पक्षातील वरिष्ठांपुढे आहे. मगो पक्षानेही आपला उमेदवार निश्चित केलेला आहे. पण संख्याबळ कमी पडत असल्याने त्यांनी गळ टाकलेला आहे. त्यात एखादा नगरसेवक अडकल्यास प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी बाजू पलटेल अशी अपेक्षा ते धरुन आहेत. त्यामुळे दोन्ही क्रॉस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्षभरापूर्वी व्यंकटेश नाईक हे मगो, काँग्रेस व भाजपा या तिनही पक्षातील नगरसेवकांच्या पाठिंबाने नगराध्यक्ष बनले होते. अधिकृतरित्या ते भाजपामध्ये असले तरी मगो पक्षाशी त्यांची तेवढीच जवळीक आहे. व्यंकटेश नाईक यांची 12 विरुद्ध 3 मतांनी निवड झाली होती. विशेष म्हणजे त्यांच्याविरोधात मगोच्या विरेंद्र ढवळीकर यांनी अर्ज भरला होता व त्यांना 3 मते मिळाली होती. या घडामोडीनंतर मगोचे तिघे नगरसेवक पक्षापासून दुरावले होते. त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी मगोच्या वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. फोंडा पालिकेच्या सत्ताकारणातील काँग्रेसची भूमिका संपुष्टात आल्याने भाजपा विरुद्ध मगो अशीच चुरस लागली आहे.









