11 हजार कर्मचाऱयांना हटवले ः सोशल मीडिया क्षेत्रात खळबळ
लंडन, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीने 13 टक्के लोकांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 87 हजार कर्मचाऱयांपैकी 11 हजार जणांना दणका दिल्याने सोशल मीडिया जगतात खळबळ निर्माण झाली आहे. गेल्या आठवडय़ात ट्विटर कंपनीनेही अशीच कर्मचारी कपात केल्यामुळे कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
ट्विटरनंतर आता दिग्गज सोशल मीडिया कंपनी ‘फेसबुक-मेटा’ने मोठय़ा प्रमाणात टाळेबंदीची घोषणा केली आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने बुधवारी याची घोषणा केली. खर्च कमी करण्यासाठी कंपनी कर्मचारी कपात करण्यात येत असल्याचे ‘मेटा’ने सांगितले. ‘आज मी तुमच्यासोबत मेटाच्या इतिहासातील काही कठीण निर्णय शेअर करत आहे. मी माझ्या कंपनीचा आकार 13 टक्क्मयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आमच्या 11,000 कर्मचाऱयांना बाहेर पडावे लागेल’, असे मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी बुधवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वाढीव खर्च आणि महसुलातील घट या कारणांमुळे कंपनीवर आर्थिक ताण येत असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी इलॉन मस्कच्या ट्विटर आणि मायक्रोसॉफ्टने मोठय़ा प्रमाणावर कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे. ट्विटरने गेल्या आठवडय़ात आपल्या अर्ध्या कर्मचाऱयांना काढून टाकले.
16 आठवडय़ांचे बेसिक वेतन देणार
कंपनीला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी आम्ही अतिरिक्त पावले उचलत आहोत, असेही झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केले. ठराविक खर्चात कपात करणे आणि नवीन नियुक्त्या कमी करणे असे मार्ग सद्यस्थितीत सुचविण्यात आले आहेत. सध्या कमी केलेल्या कर्मचाऱयांना प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी दोन अतिरिक्त आठवडय़ांसह 16 आठवडय़ांचे मूळ (बेसिक) वेतन देण्यात येईल. तसेच कर्मचाऱयांना सहा महिन्यांचा आरोग्यसेवेचा खर्चही मिळेल, असेही जाहीर करण्यात आले.
‘मेटा’मध्ये सुमारे 87,000 कर्मचारी
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍप या तिन्हींची मूळ कंपनी ‘मेटा’ प्लॅटफॉर्म ही आहे. ‘मेटा’मध्ये सध्या सुमारे 87,000 कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनी यापैकी 13 टक्के कर्मचाऱयांना कामावरून काढत आहे. काही चुकीच्या निर्णयांमुळे कंपनीची ही अवस्था झाल्याचे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी स्वतःलाही जबाबदार धरले आहे. फेसबुकची स्थापना 2004 मध्ये झाली होती आणि त्यानंतर कंपनी पहिल्यांदा मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कपात करत आहे. कोरोनाच्या काळात कंपनीचा व्यवसाय खूप वाढला होता. गेल्यावषी सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीने एका वर्षात 28 टक्के नवीन भरती केली होती. पण या वषी ‘मेटा’चे शेअर्स जवळपास 73 टक्क्मयांनी प्रचंड घसरले आहेत.
टिकटॉक-यूटय़ूबशी संघर्ष
फेसबुक (मेटा प्लॅटफॉर्म) आता टिकटॉक आणि यूटय़ूबसारख्या प्लॅटफॉर्मशी टक्कर देत आहे. या 18 वर्ष जुन्या कंपनीतून युजर्स टिकटॉक आणि यूटय़ूबकडे वळत असल्यामुळे कंपनीच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. कंपनीने आधीच नवीन भरतीवर बंदी घातली होती आणि आता ती मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कपात करणार आहे. कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीमुळे झुकेरबर्गच्या एकूण संपत्तीतही मोठी घसरण झाली आहे.









