ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील सतलज नदीतून सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी बोट जप्त केली आहे. बीओपी डीटी मलजवळ ही बोट सापडली. ज्या ठिकाणाहून ही बोट जप्त करण्यात आली आहे, तिथून सतलज नदी पाकिस्तानातून भारतात प्रवेश करते. या ठिकाणी अनेक वेळा हेरॉइन तस्करांना पकडण्यात आले आहे. पाकिस्तानही या भागात शस्त्रास्त्रांची तस्करी करतो. या बोटीत कोण होते, याची माहिती आद्याप समोर आली नसून, सुरक्षा एजन्सी या प्रकरणाचा तपास करत आहे.
फिरोजपूरमध्येच अडकला होता पंतप्रधानांचा ताफा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफाही 5 जानेवारी रोजी फिरोजपूर जिल्ह्यात अडकला होता. पाकिस्तानच्या सीमेवरील परिस्थितीमुळे फिरोजपूर हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. बुधवारी पंतप्रधानांचा ताफा सुमारे 20 मिनिटे अत्यंत असुरक्षित भागात राहिला. ज्या भागात मोदींचा ताफा थांबला तो भाग दहशतवाद्यांशिवाय हेरॉईन तस्करांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वषी सप्टेंबरमध्ये याच भागात दहशतवादी हल्ला झाला होता.