वृत्तसंस्था/ पॅरिस
फिफा विश्वचषक विजेत्या अर्जेंटिनाने आता जगातील नंबर वन फुटबॉल संघ होण्याचा बहुमान मिळवला आहे. अर्जेंटिनाने नुकत्याच झालेल्या दोन मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यांत दणदणीत विजय संपादन केले. याच विजयातून अर्जेंटिनाला क्रमवारीत नंबर वनचे स्थान गाठता आले. मेसीच्या नेतृत्वात अर्जेंटिना संघाने फिफा विश्वचषक पटकावला. आता अर्जेंटिनाने सहा वर्षांनंतर पुन्हा नंबर वनचे स्थान पटकावले. विश्वचषकातील उपविजेत्या फ्रान्सची दुसऱ्या तर ब्राझीलची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. बेल्जियम चौथ्या स्थानावर असून इंग्लंड पाचव्या, हॉलंड सहाव्या, क्रोएशिया सातव्या, इटली आठव्या, पोर्तुगाल नवव्या तर स्पेन दहाव्या स्थानी विराजमान आहे. भारतीय संघाला चार स्थानाचा फायदा झाला असून ताज्या क्रमवारीत ते 102 व्या स्थानी आहेत.









