149 देशांच्या यादीत भारत 139 व्या स्थानी
मागील वर्षी कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला. महासत्ता म्हणवून घेणाऱया देशांनाही या महामारीने हैराण केले. वाढती बेरोजगारी आणि आजाराने लोकांना त्रस्त केले. पण अनेक अडचणींनंतरही अनेक देशांमध्ये लोकांचा निर्धार कायम आहे. युरोपीय देश फिनलंड यापैकीच एक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्टमध्ये फिनलंड सलग चौथ्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. या यादीत डेन्मार्क दुसऱया स्थानावर आहे. तर तिसऱया स्थानी स्वीत्झर्लड तर चौथ्या स्थानी आइसलँड आहे. नेदरलँडला पाचवे स्थान मिळाले आहे. पहिल्या 10 देशांमध्ये न्यूझीलंड हा एकमेव बिगरयुरोपीय देश आहे. तर ब्रिटन मात्र यंदा 13 व्या स्थानावरून खाली येत 17 व्या स्थानावर पोहोचला आहे.

वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्टमध्ये भारत 139 व्या स्थानावर आहे. मागील वर्षी भारताला 156 देशांच्या यादीत 144 वे स्थान मिळाले होते. अहवालानुसार बुरुंडी, येमेन, टांझानिया, हैती, मालावी, लेसोथो, बोत्सवाना, रवांडा, झिम्बाम्बे आणि अफगाणिस्तान हे अत्यंत कमी आनंदी देश आहेत. तर चीन यंदा यादीत 19 व्या स्थानावर पोहोचला आहे. नेपाळला 87 वे, बांगलादेश 101, पाकिस्तान 105, म्यानमार 126 आणि श्रीलंका 129 व्या स्थानावर आहे.
हा अहवाला तयार करण्यासाठी 149 देशांमधील लोकांना स्वतःच्या आनंदीपणाचा दर नमूद करण्यास सांगण्यात आले होते. याचबरोबर या डाटात जीडीपी, सामाजिक सहाय्य, स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचाराची पातळी पडताळून पाहत प्रत्येक देशाला हॅप्पीनेस स्कोर देण्यात आला आहे.









