वृत्तसंस्था/ कोपनहेगन
फिनलंडने डेन्मार्कवर 1-0 अशा गोलफरकाने मात करून युरो चषक 2020 स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मात्र एरिकमसनच्या घटनेमुळे दोन्ही संघांतील खेळाडू तणावाखाली होते.
या सामन्याचा पूर्वार्ध संपण्यास चार मिनिटांचा अवधी असताना एरिकसन हृदयगती थांबल्याने अचानक कोसळला होता, त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर युफाने हा सामना लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याच्यावरील धोका टळल्याचे व तो पूर्ण शुद्धीवर असल्याचे समजल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंनी सामना पुढे चालू ठेवण्याची विनंती केल्यावर सुमारे दोन तासानंतर सामना सुरू करण्यात आला. पूर्वार्धात दोन्ही संघांकडून फारशी चमकदार कामगिरी झाली नव्हती. पण उत्तरार्धात डेन्मार्कने वर्चस्व राखले होते. त्यांना फारशा संधी निर्माण करता आल्या नाहीत. पण 60 व्या मिनिटाला फिनलंडने सामन्यातील पहिले व एकमेव यश मिळविले. त्यांच्या जोएल पोजानपेलोने हेडरवर हा गोल नोंदवला. डेन्मार्कचा गोलरक्षक श्मीचेलला हा हेडर रोखण्यात अपयश आले.
14 मिनिटानंतर डेन्मार्कला बरोबरी साधण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. बॉक्स क्षेत्रात पोल्सनने फाऊल केल्यानंतर मिळालेल्या पेनल्टीवर हॉजबर्गला त्यावर गोल नोंदवता आला नाही. एरिकसनच्या घटनेचे दडपण असल्याने त्याने मारलेल्या फटक्यात फारशी ताकद नव्हती. त्यामुळे फिनलंडचा गोलरक्षक ऱहॅडेकीने तो सहजपणे थोपवला. यानंतरही डेन्मार्कला संधी निर्माण करता आल्या नाहीत आणि फिनलंडने युरो पदार्पणातील पहिलाच सामना जिंकून विजयी सलामी दिली.
एरिकसनची प्रकृती स्थिर
डेन्मार्कचा 29 वर्षीय मिडफील्डर एरिकसन हॉस्पिटलमध्येच असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डेन्मार्क फुटबॉल संघटनेने रविवारी सांगितले. शनिवारी फिनलंडविरुद्धच्या सामन्यात पूर्वार्ध संपण्याच्या सुमारास एरिकसन अचानक कोसळला होता. मैदानावरच त्याच्यावर सीपीआर उपचार करण्यात आल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ‘आज सकाळी आम्ही त्याच्याशी बोलले आणि त्याने संघसहकाऱयांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची पुन्हा तपासणी करण्यात येणार असल्याने तो काही काळ हॉस्पिटलमध्येच राहणार आहे,’ असे डेन्मार्क फुटबॉल संघटनेने सांगितले.









