गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केलेला विश्वास : आमच्यासाठी ही विधानसभा निवडणुकीची सेमिफायनल
प्रतिनिधी / मडगाव
मागच्या मडगाव पालिका निवडणुकीत फातोर्डा फॉरवर्डचे 11 पैकी 11 उमेदवार निवडून आले होते. यावेळी आपल्या फातोर्डा फॉरवर्ड समितीच्या वतीने 13 उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. आपले 13 ही उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी आम्ही जे पॅनल उभे केले आहे ते अनुभव आणि जोश यांचा एक उत्कृष्ट मिलाफ आहे. आम्ही अनुभवी उमेदवारांबरोबर 70 टक्के नवीन चेहरे रिंगणात उतरविले आहेत. सर्व धर्मांच्या आणि जातींच्या उमेदवारांना आमच्या पॅनलमध्ये प्रतिनिधीत्व दिले आहे. आमच्यासाठी ही निवडणूक केवळ पालिका निवडणूक नाही. येत्या वषी येणाऱया विधानसभा निवडणुकीची आमच्यासाठी ही सेमिफायनल आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.
सध्याचे सरकार गोवाविरोधी असून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी या सरकारने म्हादई कर्नाटकाला विकली. कोळशाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी मोलेसारख्या जैवसंवेदनशील असलेल्या अभयारण्यातील लाखो वृक्षांची कत्तल करण्यासाठी ते पुढे सरसावले आहे. अशा सरकारला वेसण घालण्यासाठी आणि त्यांना सत्ताभ्रष्ट करण्यासाठी सर्व गोवावादी शक्ती एकत्र येऊ लागल्या आहेत. गोवा आताच वाचविण्याची गरज असून त्यासाठी टीम गोवा ही संकल्पना मूळ धरू लागली आहे. ही निवडणूक त्याची सुरुवात आहे, असे सरदेसाई म्हणाले.
‘सबका साथ, सबका विकास’ तत्त्व पुढे नेले
भाजपचे ‘सबका साथ, सबका विकास’ हे तत्त्व खऱया अर्थाने फातोर्डात गोवा फॉरवर्डने पुढे नेले आहे. आम्ही असे काम केले म्हणूनच यावेळी आम्ही लोकांकडे हक्काने मते मागत आहोत. मागची पाच वर्षे आम्ही नगरपालिकेत स्थिर प्रशासन दिले. यादरम्यान आमचा प्रयत्न फातोर्डा हे आधुनिक शहर बनविण्याचा होता. त्यातूनच रवींद्र भवन ते आर्लेम हा गोव्यातील पहिला ‘स्मार्ट रोड’ अस्तित्वात येऊ शकला. ओपिनियन पोल चौक तयार करून पणजीत जसा कांपालचा रस्ता आहे तसा फातोर्डात हा सांस्कृतिक रस्ता तयार झाला. आमच्यामुळेच हा रस्ता कार्निव्हल आणि शिमग्याच्या मिरवणुकांचा कायमचा रस्ता बनला आहे, असे सरदेसाई म्हणाले.
अनेक विकासकामे राबविली
आम्ही एसजीपीडीएत आधुनिक मासळी मार्केट प्रकल्प उभारला, तो बृहन्मुंबई पालिकेने एक मॉडेल म्हणून स्वीकारला आहे. रस्ते रूंद करण्यासाठी लोकांच्या संमतीने रस्त्यावरील धार्मिक स्थळे हलवून दुसरीकडे त्यांचे स्थलांतर केले. फातोर्डा हे गोव्यातील एकमेव शहर असेल जिथे आम्ही खासगी मैदान उभारले असून भविष्यात तिथे आम्हाला स्कूल सुरू करायचे आहे. या मतदारसंघात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. भू-गटार वाहिन्यांचे 97 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे शहर पायाभूत सुविधांनी युक्त केले आहे. आता आम्हाला भविष्यासाठी तयार असलेले शहर करायचे आहे, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
सोनसडय़ाची समस्या आपण असताना तयार झालेली नाही. फोमेंतोचा तो प्रकिया प्रकल्प आणताना आपण फातोर्डाचा आमदार नव्हतो, तर दामू नाईक होते. आपण आमदार झाल्यानंतर ही समस्या सोडविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण आपल्याला प्रत्येक वेळी विरोध झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण मंत्री असताना सर्वांत प्रथम बायो-रेमेडिएशन प्रक्रिया सुरू केली. पण त्यावेळीही विरोध झालाच. आज कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी सरकार बायो-मिथेनेशन तंत्रज्ञान आणू पाहत आहे. ते आपण दोन वर्षांपूर्वी आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या सरकारने त्यावेळी त्याला परवानगी दिली नाही. आता हे तंत्रज्ञान आणण्यासाठी मडगाव पालिकेने आपले 42 कोटी रुपये कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे जमा करूनही हे सरकार त्याची निविदा काढत नाही. हे सगळे पाहिल्यास ही समस्या नष्ट व्हावी हे या सरकारलाच वाटत नाही असे वाटते. दुसऱया बाजूने याच सरकारने पुरस्कृत केलेली समिती 2024 पर्यंत या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याचे आश्वासन देते. याला दुटप्पीपणा म्हणायचे का हेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली.
अनेक कामे राबवायची आहेत
फातोर्डात आम्ही स्वतःच्या पैशांनी वाहतूक सिग्नल बसवून वाहतुकीची कोंडी सोडविली. आता शहराच्या सुरक्षेसाठी सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे आहेत. फातोर्डा-मडगावसाठी एक आधुनिक बसस्थानक उभारायचे आहे. शहराचे वारसा महत्त्व अबाधित राखून शहर आधुनिक करण्याबरोबर पर्यावरणाची आणि कृषी कामाचीही राखण करायची आहे. फातोर्डा हा गोव्यातील एकच मतदारसंघ आहे जिथे शेतकऱयांना सर्व सुविधा मोफत मिळतात. रस्ते साफ करण्यासाठी यांत्रिकी पद्धत वापरायची आहे. कचऱयाची समस्या कायमची मिटवायची आहे. यासाठी लोकांनी आम्हाला या निवडणुकीत साहाय्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.









