जीवे मारण्याचीही दिली धमकी, महसुल कर्मचाऱयांचे लेखणी बंद आंदोलन
प्रतिनिधी / फलटण
येथील प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी देणाऱया वाळूमाफीया संशयितास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध करीत महसूल कर्मचाऱयांनी आज लेखणी बंद आंदोलन केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 16 रोजी सांयकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सजाई गार्डन येथील शासकीय बैठक कामकाज आटोपल्यानंतर प्रांत अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसिलदार समीर यादव व अन्य आधिकारी फलटणकडे जात असताना या मार्गावरून बेकायदा विनापरवाना वाळुचा हायवा ट्रक भरधाव वेगात फलटणकडे जात होता. संबधित ट्रकचालकास शासकीय अधिकायांनी थांबविले व चौकशी केली. मात्र ट्रकचालकाकडे वाळु वाहतुकीचा परवाना नव्हता. त्यामुळे गांव कामगार तलाठी धेंडे यांनी वाळुचा हायवा ट्रक पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याची सूचना केली. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करीत ट्रकचालकांनी स्वतःच्या ताब्यात असलेला ट्रक तसाच पुढे रेटत नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वतः प्रांताधिकारी यांनी ट्रक पोलीस ठाण्यात घे अशा सूचना केल्या असता संशयित आरोपी कैलास महादेव ननावरे यांनी प्रांताधिकारी यांच्या अंगावर धावत जावुन धक्काबुक्की करीत; तुला सोडणार नाही तुला जीवे मारून टाकीन असा दम टाकत होता. त्यामुळे ननावरे याच्याविरूध्द प्रांताधिकारी जगताप यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी धक्काबुक्की करणे व जीवे मारण्याची धमकी देणे असा गुन्हा दाखल केला आहे.
दि. 17 रोजी महसुल कर्मचाऱयांनी या घटनेचा निषेध करीत लेखणी बंद आंदोलन केले. लेखणी बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन महसुल कर्मचाऱयांनी आज सकाळी तहसिलदार समिर यादव यांना दिले होते.








