फलटण – . प्रतिनिधी
तावडी ता. फलटण येथे एका परप्रांतीय तरुणाने आत्महत्या केली आहे. प्रेमलाल गंगा प्रसाद कुसवाह, वय 35 असे संबंधित तरुणाचे नाव आहे. त्याला त्याच्या मूळ गावी जायचे असताना लॉक डाऊनमुळे ते शक्य होत नसल्याने वैफल्यग्रस्त अवस्थेत त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा या परिसरात आहे.
शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी तावडी ता. फलटण येथील पिंपळाचा मळा येथे प्रेमलाल गंगा प्रसाद कुसवाह, वय 35, राहणार सलोनी सराय, ता.सबाजपूर, थाना पाली, जिल्हा हरदोई, उत्तर प्रदेश याने सकाळी सहा वाजताच्या सुमारास चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान सदर परप्रांतीय तरुणास व त्याच्यासमवेत तावडी येथे वास्तव्यास असलेले त्याचे नातलग व सहकारी यांना त्यांच्या मूळ गावी परतायचे होते. या युवकाची गावाकडे फोनाफोनी सुरु होती, तसेच त्याने गावाकडे पायी चालत जाण्याचाही निर्णय घेतला होता. परंतू लॉक डाऊनच्या काळात त्यास बाहेर पडता न आल्याने वैफल्यग्रस्त अवस्थेत या तरुणाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा या परिसरामध्ये होत आहे. सदर घटनेची फिर्याद तावडीचे पोलीस पाटील सुनिल गायकवाड यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे हे करीत आहेत.