शिवसेनेच्या शिष्टमंडळाची केंद्रीय आपत्ती मंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
संसदेच्या चालू अधिवेशन काळात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अमित शहा यांची भेट घेवून कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या महापूर व भुस्खलनामुळे जे काही नुकसान झालेले आहे त्याकरीता जास्तीत जास्त पॅकेज द्यावे, अशी मागणी केल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले.
शिवसेनेच्या या शिष्टमंडळामध्ये खासदार विनायक राऊत, खासदार संजय मंडलिक, खासदार राहूल शेवाळे, डा. श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावीत आदी उपस्थित होते. यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, मुसळधार आणि संततधार पावसामुळे महाराष्ट्राच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भागात मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलन झाले आहेत. सर्वाधिक प्रभावित जिह्यांमध्ये कोल्हापूर जिल्हयाचाही समावेश होत असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेच्या नुकसानीसह विध्वंस व विनाश झाला आहे.
यामध्ये भूस्खलनामुळे शेती आणि बागायती पिकांचे नुकसान होवून शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीसंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु असून केंद्राने महापुरामुळे प्रभावीत झालेल्या जिह्यांकरीता भरीव पॅकेज द्यावे. याचबरोबर, दरवर्षी महापुरामध्ये एनडीआरएफच्या पथकाला पुरपरिस्थितीत बचावकार्यासाठी बोलावावे लागते, एनडीआरएफची टीम पोहचेतोपर्यंत वेळ लागत असल्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय अशा संकटाच्यावेळी थोड्या वेळात मदत आणि बचाव कार्य व्हावे यासाठी कोल्हापूर व कोकण विभागात एनडीआरएफचे तळ किंवा उपकेंद्र व्हावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने केल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.
या महापुरामुळे बचाव आणि मदत कार्यासाठी स्थानिक प्रशासन, राज्य शासन आणि केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी आम्ही तळ ठोकून होतो. मुसळधार पावसामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलनाला सामोरे जावे लागत असल्याने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून त्वरित आणि दीर्घकालीन सुधारात्मक उपाय प्रदान करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करावी अशी मागणी केंद्रीय आपत्ती मंत्री अमित शहा यांचेकडे केल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.