द्वारकेतील आपल्या घरात सत्राजिताने आनंदाने प्रवेश केला. त्या घराच्या ऐश्वर्याचे वर्णन महामुनी शुकदेव करतात ते असे-
आधींच सदन श्रीमंडित । विशेष कौतुकें उत्साहभरित। मंगळें केलीं जेथ समस्त । वेदपारंगतद्विजवचनीं ।
ऐशिये सदनीं प्रवेशोनी । देवतायतनीं स्यमंतकमणि।
स्थापिला द्विजांच्या हस्तें करूनी । त्याची करणी अवधारा । स्वर्चित स्यमंतक जिये स्थानीं । तिये राष्ट्रीं कल्याणश्रेणी । नोहें विघ्नांची काचणी । प्रसवे अनुदिनीं अष्टभार ।अष्टौ भार गाङ्गेय शुद्ध। जें कां बोलिजे जाम्बूनद । स्वर्चित स्यमंतकमणि विशद। प्रसवे प्रसिद्ध दिनीं दिनीं ।ऐकें पभो परीक्षिति। भारसंख्येची व्युत्पत्ति । बोलिली असे निबंधीं गणितीं। ते तुजप्रति निरूपितों ।
सत्राजिताचे घर समृद्धीने भरलेले होते. सर्वजण उत्साहात होते. घरात मंगल उत्सव चालू होता. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण वेदघोष करीत होते. सत्राजिताने आपल्या घरातील देवघरात यथासांग पूजा करून स्यमंतकमण्याची स्थापना केली. हा स्यमंतकमणी सामान्य नव्हता. त्याची करणी ऐका. हा स्यमंतकमणी ज्या ठिकाणी असेल व त्याचे नित्य पूजन होत असेल, त्या राष्ट्राचे कल्याण होत असे. कोणतेही विघ्न तेथे येत नसे. हा दररोज आठ भार शुद्ध सोने प्रसवत असे, देत असे. आता एक भार सोने म्हणजे किती याचे गणित ऐका.
चौ व्रीहींची एक गुंज । पंच गुंजांचा पण हें बुझ ।
आठां पणांचा धरण सहज ।
कर्ष तूं उमज धरणाष्टकें ।
चारी कर्ष एक्मया पळा । शतपळांची बोलिजे तुळा ।
विंशति तुळांचा मोकळा । भार बोलिला शास्त्रज्ञीं ।
ऐसे सुवर्नभार अष्ट । अहरह प्रसवे स्यमंतक श्रे÷ ।
तेणें लाभें अतिसंतुष्ट । जो रविनि÷ सत्राजित ।
चार व्रिहींचा एक गुंज, पांच गुंजाचा एक पण, आठ पणांचा एक धरण, आठ धरणांचा एक कर्ष, चार कर्षाचा एक पळ, शंभर पळांची एक तुळा, वीस तुळांचा एक भार! असे आठ भार सोने दररोज स्यमंतकमणी देत असल्याने सूर्यभक्त सत्राजिताला अत्यंत आनंद झाला.
आणिक स्यमंतकमणीचे गुण । राष्ट्री दुर्भिक्षें न पीडे जन ।
कदापि न पडे अवर्षण । वर्षें पर्जन्य जनइच्छा ।
जरी मरी शारें वारें । भूतें प्रेतें भयंकरें ।
नाना अरिष्टे’ विघ्नें क्रूरें । महाविखारें न बाधती ।
चौऱयांशीं लक्ष दुर्घट रोग । तियें राष्ट्रीं न करिती लाग ।
सर्प वृश्चिक तक्षक नाग । तद्भयप्रसंग तेथ नसे ।
काम क्रोध लोभ मोह । चिंता हृद्रोग शोक भय ।
मद मत्सर दंभ व्यय । हानि क्षय मनोग्लानि ।
ऐसिया अनेक आधि व्याधि । अशुभें दुश्चिन्हें दुष्कृतावधि ।
व्याघ्रादि हिंस्रश्वापदमांदी । कोणा न बाधी ते राष्ट्रीं ।
या स्यमंतक मण्याचे आणखीही काही विलक्षण गुण होते. हा जिथे असेल व त्याचे नित्य पूजन होत असेल तेथे कोणतेही दुर्भिक्ष कोणाही माणसाच्या वाटेला कधी येत नसे.
Ad. देवदत्त परुळेकर