ऑनलाईन टीम/तरुण भारत
मध्यंतरी रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. यांनतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली. पण असं काहीही घडलं नाही. उलट प्रशांत किशोर वारंवार काँग्रेसवर निशाणा साधताना दिसत आहेत. आता तर रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश का झाला नाही याविषयी प्रियांका गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रियंका गांधी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “प्रशांत किशोर आणि काँग्रेसची भागीदारीसाठी चर्चा सुरू होती. मात्र, ही भागीदारी होऊ शकली नाही. मला वाटतं यामागे अनेक कारणं होती त्यामुळेच ही भागीदारी होऊ शकली नाही. काही कारणं त्यांच्याकडून होती, तर काही कारणं आमच्याकडून होती. मी त्याच्या तपशीलात जाऊ इच्छित नाही. काही मुद्द्यांवर सहमत होणं शक्य नव्हतं त्यामुळे भागीदारीची ही चर्चा पुढे जाऊ शकली नाही.”
काँग्रेसमध्ये बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश न देण्याचा मतप्रवाह असल्याने प्रशांत किशोर यांना पक्ष प्रवेश दिला नाही हा आरोप प्रियंका गांधी यांनी फेटाळला. असं असतं तर प्रशांत किशोर यांच्यासोबत इतक्या पुढच्या स्तरावर चर्चा का झाली असती असा सवाल करत त्यांनी हे कारण नाकारलं. प्रियंका गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता तयार झाली होती हेही मान्य केलं. मात्र, काही कारणांमुळे तसं होऊ शकलं नाही, असं नमूद केलं.