मोठमोठी स्वप्ने दाखवून लोकांचा अपेक्षाभंग केल्याची टीका
प्रतिनिधी /पणजी
’अधिकारी आपले ऐकत नाहीत’, अशी कबुली देऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतःचे हसे करून घेतले आहे, अशी जोरदार टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. अधिकारी ऐकत नाहीत तर मग तुम्ही कारवाई करणार म्हणतात ती कुणावर? असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे, व अशा हतबल, कमजोर मुख्यमंत्र्यांची साथ देण्यापेक्षा गोमंतकीयांनी आम आदमी पार्टीचे सरकार घडविण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन केले आहे.
दिल्लीतून प्रसारित केलेल्या एका व्हीडिओद्वारे ते बोलत होते. एका मुख्यमंत्र्याचा आदेश अधिकारी मानत नाही, असे कसे होऊ शकते? एवढे कमकुवत मुख्यमंत्री आहात का तुम्ही? मंत्रीही तुम्हाला जुमानत नाहीत, पार्टी हायकमांडही तुमचे ऐकत नाही, तर मग तुमचे ऐकतो तरी कोण? एवढी वाईट परिस्थिती असेल तर मुख्यमंत्रीपदाच्या त्या खुर्चीवर बसून फायदा तरी काय? असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
आम आदमी पार्टीने मोफत पाणी देण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनीही प्रत्येक कुटुंबाला 16 हजार लीटर पाणी मोफत देण्याची घोषणा केली होती. परंतु त्यांची ती घोषणा केवळ राजकीय घोषणाबाजीच ठरली. कुणालाही मोफत पाणी मिळाले तर नाहीच, उलटपक्षी पूर्वीपेक्षा कित्येक पट जादा रकमेची बिले लोकांच्या हाती पडली. त्यावरून मुख्यमंत्री तोंडघशी पडले व ’अधिकारी आपले ऐकत नाहीत’, अशी कबुली देणे त्यांना भाग पडले होते.
तोच धागा पकडून केजरीवाल यांनी सदर व्हीडिओ प्रसारित केला असून डॉ. सावंत यांच्या या अनोख्या, हतबल कार्यपद्धतीपुढे अक्षरशः हात जोडले आहेत. तुम्ही काहीतरी चांगले कराल, अशी अपेक्षा गोव्यातील लोक बाळगून होते, परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. तुम्ही जाहीर केलेल्या एकेका योजनेतून फायदा होण्यापेक्षा लोकांना नुकसानीच जास्त होऊ लागली आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात सरकारबद्दल प्रचंड चीड आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
या प्रकारावर गोमंतकीयांना उद्देशून बोलताना केजरीवाल यांनी एवढा हतबल मुख्यमंत्री तुम्हाला हवा आहे का? असा सवाल विचारला आहे. दिल्ली हे अर्धे राज्य आहे. आमच्याकडे पूर्ण अधिकार नाहीत. तरीही आम्ही दिल्लीतील लोकांना मोफत पाणी, वीज, महिलांसाठी मोफत बसप्रवास, यासारख्या अनेक सुविधा देत आहोत. दिल्लीत लोकांना 24 तास अखंडित वीज आणि पाणी देत आहोत. ऐकण्यास हे सर्व काही जादू, चमत्कार असल्यासारखे वाटते. परंतु दिल्लीत आम्ही ते करून दाखवले आहे, तर एक परिपूर्ण राज्य असलेल्या गोव्यात हे का होऊ शकत नाही? असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.









