कै. विनोद होसुरकर, अमित मासेकर यांना श्रद्धांजली
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
दिवंगत फुटबॉलपटू विनोद होसुरकर व अमित मासेकर यांच्या स्मृतीला उजाळा देत युनियन जिमखाना येथील टर्फ मैदानावर फ्रेंड्स फुटबॉल क्लब व तिरंगा फुटबॉल क्लब यांच्यात झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात फ्रेंड्स संघाने 4-2 असा विजय मिळविला. यावेळी या दोन दिवंगत फुटबॉलपटूंना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुपर चषक सिक्स ए साईड फुटबॉल स्पर्धेवेळी कॅम्पमधील तिरंगा व फ्रेंड्स दोन जुने क्लब क्लबच्या फुटबॉलपटूंनी प्रदर्शनीय सामना आयोजित करण्याचे ठरविले होते. फ्रेंड्स क्लबचा कोल्हापुरातील पीटीएम संघातून खेळलेला व ज्येष्ट पंच विनोद होसुरकर आणि तिरंगा स्पोर्ट्स क्लबचा बेळगावातील हुकमी एक्का म्हणून समजला जाणारा अमित मासेकर या दोन खेळाडूंच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या प्रदर्शनीय सामन्यात आयोजत करण्यात आले. फ्रेंड्स क्लबमधून अनिश चौधरी, अबिर किल्लेदार, नाजिम बेपारी, इम्रान बेपारी, तौफिक कादरी, नागेश कंग्राळकर, जेबक बेपारी, शैलेश, युवराज तरळे तर तिरंगामधून अल्लाबक्ष बेपारी, क्रिस्टी पिल्ले, शाहिद बिस्ती, बापू, फ्रँकी पिल्ले, शकील पिल्ले, रॉबर्ट फ्रान्सिस, गिरीश गणेशकर यांच्यात हा सामना खेळविण्यात आला. निर्धारित वेळेत दोन्ही संघानी 1-1 अशी बरोबरी केली. फ्रेंड्सतर्फे नाजिम बेपारी तर तिरंगातर्फे शाहिद बिस्ती यांनी गोल केले. त्यानंतर पंचांनी टायबेकरचा अवलंब करण्यात आला. त्यात फ्रेंड्स संघाने 4-2 अशा फरकाने विजय संपादन केला. फ्रेंड्सतर्फे युवराज तरळे, इम्रान बेपारी, जेबक बेपारी यांनी गोल केले तर तिरंगातर्फे गिरीश गणेशकरने गोल केला. सामन्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.









