मंत्री शशिकला जोल्ले यांची माहिती : 20 जिल्हय़ांचा दौरा करणार
वार्ताहर /हुबळी
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासह त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. सर्व तालुक्यांत कोविड केअर सेंटर स्थापनेसह प्राथमिक आरोग्य केंद्रे, सर्व जिल्हा रुग्णालयात मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड स्थापन्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली.
धारवाडमधील कमलापूर येथे कोरोनाच्या दुसऱया लाटेत आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या शिवाजी मल्लाप्पा गारगे (वय 12) आणि अमृता (वय 4) या मुलांची भेट घेऊन सांत्वन केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
मंत्री जोल्ले पुढे म्हणाल्या, गेल्या 15 दिवसांपासून राज्यातील 20 जिल्हय़ांचा प्रवास हाती घेऊन कोरोनाच्या दुसऱया लाटेत पालकांना गमावलेल्या मुलांची आपण भेट घेत आहे. अनाथ झालेल्या मुलांना मुख्यमंत्र्यांच्या बालसेवा योजनेंतर्गत मोफत शिक्षण आणि दरमहा प्रत्येकी 3,500 रुपये मदतनिधी दिला जात आहे. दहावीनंतर मुलांना लॅपटॉप, टॅब दिले जातील. मुलगी असल्यास तिला 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपये दिले जातील. एकाच पालकांना गमावलेल्या मुलांचा शोध घेऊन बालस्वराज्य पोर्टलमध्ये नोंद केली जात आहे. कोरोना तिसऱया लाटेवर नियंत्रण आणण्यासाठी कोणकोणती पावले उचलावीत, याबाबत मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी कर्नाटक बालविकास ऍकॅडमीचे अध्यक्ष ईरण्णा जडी, रेशीम विक्री मंडळाच्या अध्यक्षा सविता अमरशेट्टी, धारवाड जि. पं. सीईओ डॉ. बी. सुशीला, जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजेश्वरी सालगट्टी आदी उपस्थित होते.









