प्रसरण आणि आकुंचन ह्या दोन विरुद्ध कृती आहेत. प्रथमदर्शनी पाहता आपल्यास असे जाणवते की आकुंचन आणि प्रसरणाचा संबंध हा केवळ एखाद्या विशिष्ट पदार्थाशीच संबंधित आहे पण मुळात मानवी संबंधातसुद्धा हा नियम लागू पडतो. मनुष्य हा समाजाभिमुख प्राणी असल्याने त्यास सर्व व्यवहार हे इतर मनुष्याशीच करावे लागतात. जेवढा सहवास अधिक तेवढा स्नेह अधिक, जेवढा स्नेह अधिक तेवढय़ाच प्रमाणात दुरावा अधिक आणि जेवढा दुरावा त्यापेक्षाही अवज्ञा अधिक असते. म्हणजेच मानवी संबंध हे सतत आकुंचन आणि प्रसरण क्रियेशी निगडित आहेत. व्यवस्थापनशास्त्रात मानवी मूल्यांबाबत किंवा मानवी संबंधांबाबत जे वर्गीकरण केले जाते ते मानवी संबंधांची व्याप्ती आणि मानवी संबंधांचे महत्त्व या दोन प्रकारात मोडते. औद्योगिक संस्थेत सलोख्याचे आणि सौहार्दपूर्ण संबंध असणे गरजेचे असते. व्यक्ती तितक्मया प्रकृती या म्हणीनुसार प्रत्येकाचे वर्तन आणि स्वभाव वेगवेगळे असतात. व्यवस्थापकाने मानवी संबंध सलोख्याचे रहावे म्हणून अनेक प्रयत्न करणे गरजेचे असते. जर व्यवस्थापकाने प्रयत्न केला नाही तर मात्र संबंधित उद्योग समूहाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते.
उत्तम व्यवस्थापक हा वैयक्तिक समुपदेशनाद्वारे पण कर्मचाऱयांचे प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे कर्मचाऱयांच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. वादविवाद निराकारण करत असतांना मतभेद किंवा वाद-विवाद सोडवणे यामुळे उद्योग समूहातील वातावरणात सामंजस्याचे वातावरण निर्माण होऊन मानवी संबंधांची व्याप्ती वाढू शकते. औद्योगिक संस्थेत अनेकवेळेला मानवी संबंध हे अपूर्ण किंवा चुकीच्या संज्ञापनामुळेसुद्धा निर्माण होतात. कर्मचारी/कामगार यांच्याशी योग्य प्रकारे संपर्क साधून त्यांच्यातील भीती, अविश्वास आणि गैरसमज संज्ञापनाद्वारे दूर केले जातात. त्याकरिता स्पष्ट संज्ञापन कर्मचाऱयांमध्ये योग्य ते बदल घडवून आणू शकते. कार्य पर्यावरण निर्मितीद्वारे कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली असणे आणि अनेक सोयी-सुविधांनी युक्त असणे आवश्यक असते. व्यवस्थापकांनी कर्मचाऱयांना त्यांच्या रोजगाराची हमी आणि सुरक्षितता याबाबत विश्वास निर्माण केल्यास मानवी संबंध चांगले होण्यास मदत होते. गरजांच्या एकत्रीकरणामुळेदेखील कर्मचारी आणि व्यवसाय संघटना यांच्यात एक मानवी संबंध निर्माण होतात. मानवी संबंधांची व्याप्ती उत्तम व्यवस्थापकाने कशी वाढवावी याबाबत श्रीसमर्थ म्हणतात की,
अग्न गृहासी लागला ! आणि सावकास निजेला !
तो कैसा म्हणावा भला ! आत्महत्यारा !!
ज्या ज्याचा जो व्यापार ! तेथें असावें खबर्दार !
दुश्चित्तपणें तरी पोर ! वेढा लावी !!
चुके ठके विसरे सांडी ! आठवण जालियां चर्फडी !
दुश्चित्त आळसाची रोकडी ! प्रचीत पाहा !! 07-19-20/03/11
म्हणजे, घराला आग लागली असताना जो कोणी त्या घरात स्वस्थ झोपलेला असेल त्यास कोणीही शहाणा किंवा चांगला म्हणणार नाही. तो आपणहून स्वतःचा घात करून घेतो आहे. प्रत्येकाने स्वतःच्या व्यवसायामध्ये जागरूक असावे. बेसावधपणे वागल्यास एखादे पोरही फसवून जाईल. जो मनुष्य चुकतो, फसतो, वस्तू विसरतो किंवा हरवतो, आणि आठवण झाल्यावर तळमळतो त्यास यश मिळणे अवघड असते. आळसाचा आणि बेसावधपणाचा असा प्रत्यय येतो.
मानवी संबंधांचे महत्त्व हे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. यात मानवी संबंधांमुळे उद्योगाची कार्यक्षमता वाढते. उत्पादन क्षमतेतही वाढ होते. मनुष्य बळ घटक हा उत्पन्नाच्या इतर घटकांपैकी खूप वेगळा आहे. मनुष्य बळ घटकाची कार्यक्षमता ही त्याच्या काम करण्याच्या मनोबलावर आधारित असते. मानवी संबंधांचे उत्तम तंत्र आत्मसात करून त्याद्वारे लोकांना प्रोत्साहित करणे आणि त्यांच्याकडून आवश्यक असणाऱया कार्याची पूर्तता करून घेणे म्हणजे चांगले व्यवस्थापन होय. चांगल्या मानवी संबंध निर्मितीमुळे यंत्र, पैसा किंवा सामुग्रीचा योग्य प्रमाणात वापर होतो. एखाद्या उद्योग समूहातील मनुष्य बळ जर स्वयंप्रेरित नसेल तर मात्र साधन
सामुग्रीचा उपयुक्त वापर होणार नाही. कर्मचाऱयांच्या प्रश्नाकडे व्यवस्थापनाने जसे लक्ष दिले असते त्याप्रमाणे उत्पादकता आणि व्यवसायाची प्रगती ठरते. कर्मचाऱयांना/कामगारांना नैतिक मान्यता देणे गरजेचे आहे कारण ते व्यवस्थापक आणि उद्योग समूहाच्या मालकासारखेच माणूस आहेत. मानवी संबंधांमुळे व्यवस्थापकांचे मुख्य उद्दिष्ट पूर्ण होऊन मनुष्य बळ जाणून घेण्यास मदत होते. त्यामुळे कर्मचाऱयांना/कामगारांना व्यवस्थापकांची भावना कळून येतात. उद्योग समूहाची नावलौकिकता वाढवायची असल्यास मानवी संबंध सलोख्याचे होऊन तेथे वाद-विवाद आणि भांडण कमी होणे, व्यवस्थापक आणि कर्मचाऱयांमध्ये सुसंवाद होणे गरजेचे आहे. मानवी संबंधांचे महत्त्व श्रीसमर्थांनी यत्न शिकवण समासात सांगितली आहे. त्यात समर्थ म्हणतात की,
नेमस्त नेटकें पुसावें !
विशद करून सांगावें !
प्रत्ययेंविण बोलावें !
तेंची पाप !!
सावधानता असावी !
नितीमर्यादा राखावी !
जनास माने ऐसी करावी !
क्रियासिद्धि !!
आलियाचे समाधान !
हरिकथा निरुपण !
सर्वदा प्रसंग पाहोन !
वर्तत जावें !! 15=16=17/09/12
म्हणजे, कोणाला काही विचारायचे असल्यास नीटपणे आणि नेमकेपणाने विचारावे. कोणाला काही सांगायचे असल्यास नीट उकळून, स्पष्ट करून सांगावे. स्वतःला अनुभव असल्याशिवाय ज्ञान देऊ नये. नेहमी सावध असावे. नीतीची मर्यादा सांभाळून वागावे. कोणतेही काम लोकांना पसंत पडेल अशाप्रकारेच करावे. जो कोणी आपल्याकडे येईल त्याचे समाधान करावे. नेहमी प्रसंग पाहून वागावे.
माधव किल्लेदार