नृगराजा भगवंताला वंदन करून पुढे म्हणतो –
कोणा एका योगेंकरून ।
जीवबह्माचें वियोगहरण ।
भवभ्रान्तीचें अस्तमान ।
योगसाधन इतुकेंचि ।
ऐसे जे कां योगाग्रणी ।
उपनिपच्छ्रुति चक्षुस्थानीं ।
करूनि अमळ हृदयभुवनीं ।
तुजलागूनी भाविती ।
तो तूं माझिया अक्षिपथा ।
प्रत्यक्ष झालासि जी सर्वथा ।
म्हणसी भवभ्रमाआंतौता ।
मजही तत्त्वता न मानिसी कां ।
इये शंकेच्या निरासा ।
कथितों माझी अधिकारदशा ।
ते ऐकिल्या प्रत्यय सहसा ।
बाणेल परेशा वस्तुत्वें ।
उरु म्हणिजे बहळ व्यसन ।
अंधकूपीं जें सरठपण ।
तेणें दुःखें अंध नयन ।
वास्तव वयुन मावळलें ।
दुःखान्धबुद्धि ऐशिया मज ।
प्रत्यक्ष झालासि तूं अधोक्षज ।
देखिलासी तेजःपुंज ।
विचित्र चोज हें गमतें ।
दृश्य भवभान गोचर ।
तेंवि मी म्हणसी दृश्यतर ।
अक्षजज्ञानाहूनि पर ।
केंवि साचार तुज कळलों ।
तरी तूं ज्यासी दृश्य होसी ।
तद्भवाबंधा मोक्षण करिसी ।
ऐसी प्रतीति श्रुतिविश्वासीं ।
अनुभवासी मज आली ।
अंधकूपीं सरठदेही ।
कित्येक युगें दुःखप्रवाहीं ।
तो तव दर्शनमात्रें पाहीं ।
दिव्यविग्रही झालों असें ।
अंधकूपीं दुःखदुर्भव ।
अपवर्ग तन्मोक्षाचें नांव । प्रत्यक्ष लाधलों मी स्वयमेव । हा इतरांसि अनुभव काय पुसो । योगेश्वरही श्रुतिलोचनीं। साधनसंपन्न अमलात्मभुवनीं ।
भाविती तो प्रत्यक्ष नयनीं ।
गोचर म्हणोनि चित्र गमे ।
केवळ जळाची शीतळता ।
जळावेगळी चढली हाता ।
कीं तेजाची प्रकाशकता ।
जे तेजावांचूनि आतुडली । किंवा धरणीचें धारण्य ।
आंगीं बाणलें जडत्वावीण। कीं पवनाचें वहिलेपण। स्पर्शावांचून आंगविलें । किं व्योमाचें व्यापकत्व । शून्यावीण सर्वगतत्व । उपलब्ध एवढें महत्त्व । तव दर्शनें भोगितसें । तो तूं दृश्यासमान कैसा । गोचर म्हणों भो जगदीशा ।
भक्तिप्रेमोत्कर्षासरिसा । बोधी परेशा तें ऐका ।
भगवन ! आपण परमात्मा आहात. शुद्ध अंतःकरणाने योगेश्वर उपनिषदांच्या दृष्टीने स्वतःच्या हृदयात आपले ध्यान करीत असतात. हे इंद्रियातीत परमात्मन ! सरडा होण्याच्या मोठय़ा दुःखामुळे मी विवेकहीन झालो असतानाही आपण साक्षात माझ्या दृष्टीसमोर कसे आलात? जेव्हा प्रपंचातून सुटण्याची वेळ येते, तेव्हाच आपले दर्शन होते.
Ad. देवदत्त परुळेकर








