ब्रिस्बेनमधील गब्बा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आमनेसामने, पॅट कमिन्स-जो रुट यांच्यात जुगलबंदीची अपेक्षा
ब्रिस्बेन / वृत्तसंस्था
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे कट्टर पारंपरिक संघ आजपासून (बुधवार दि. 8) खेळवल्या जाणाऱया ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात आमनेसामने भिडतील, त्यावेळी पॅट कमिन्स व जो रुट यांच्यातील जुगलबंदी मुख्य आकर्षण केंद्र असेल. या उभयतात कोण सरस ठरेल, यावर बऱयाच अंशी या मालिकेतील यशापयशही अवलंबून असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, पहाटे 5.30 वाजता पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होईल.
यंदा या ऍशेस मालिकेच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे असून 1950 च्या दशकापासून ऑस्ट्रेलियाने एखाद्या जलद गोलंदाजाकडे नेतृत्व सोपवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. गब्बा येथील पहिल्या कसोटीत जेम्स अँडरसन खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले असल्याने इंग्लिश कर्णधार रुटवर सामन्यापूर्वीच थोडे दडपण असेल, हे स्पष्ट झाले. बेन स्टोक्सचे पुनरागमन विशेष महत्त्वाचे असेल, असे बटलरने यापूर्वी म्हटले आहे.
जो रुटने 2021 मधील 12 कसोटी सामन्यात 66 च्या सरासरीने 1455 धावांचे योगदान दिले. मात्र, 2010-2011 मधील दुष्काळ संपवणाऱया विजयानंतर इंग्लंडला ऑस्ट्रेलियात खेळलेल्या 10 पैकी 9 कसोटी सामन्यात पराभव पत्करावे लागले आहेत. रुट मागील दोन दौऱयात कर्णधार होता. 2017-18 मध्ये 4-0 फरकाने पराभवाचा सामना करावा लागला, त्यावेळी देखील रुटकडेच नेतृत्वाची धुरा होती.
गब्बा स्टेडियमवर इंग्लंडचे रेकॉर्ड बरेच खराब आहे, असे आकडेवारी सांगते आणि ही देखील रुट अँड कंपनीसाठी प्रतिकूल बाब आहे. गब्बामध्ये इंग्लंडचा संघ 1946 पासून फक्त दोनच वेळा विजयी ठरला. मात्र, 1986 नंतर त्यांनी येथे एकही कसोटी जिंकलेली नाही.
इंग्लंडने मंगळवारी सायंकाळी 12 सदस्यीय संघ जाहीर करताना स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, मार्क वूड व ऑलि रॉबिन्सन यांचा स्पेशालिस्ट जलद गोलंदाज या नात्याने समावेश केला असून फिरकीपटू जॅक लिचचा या संघात समावेश आहे. मागील महिन्यात टीम पेनने कसोटी नेतृत्वावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेतृत्वाची धुरा कमिन्सकडे सोपवली गेली आहे. टीम पेनच्या गैरहजेरीत यष्टीरक्षण ऍलेक्स कॅरे करेल तर टॅव्हिस हेड पाचव्या स्थानी कायम असणार आहे. जानेवारीत भारताविरुद्ध 2-1 फरकाने मालिकेत पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियाने एकही कसोटी मालिका खेळलेली नाही. इंग्लंडने मात्र लंका व भारत दौरा केला. शिवाय, मायभूमीत न्यूझीलंड व भारताविरुद्ध मालिका खेळली आहे.
संभाव्य संघ
ऑस्ट्रेलिया ः पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशाने, स्टीव्हन स्मिथ, ट्रव्हिस हेड, कॅमेरुन ग्रीन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), मिशेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हॅझलवूड. राखीव ः उस्मान ख्वाजा.
इंग्लंड ः जो रुट (कर्णधार), रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, ऑलि पोप, जोस बटलर (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ऑलि रॉबिन्सन, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लिच.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ ः पहाटे 5.30 पासून.
कोट्स
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजी कर्णधार (पॅट कमिन्स) आणि इंग्लंडचा फलंदाजी कर्णधार (जो रुट) यांच्यातच जोरदार संघर्ष अपेक्षित आहे. दोन्ही महान खेळाडू आपल्या संघाला वर्चस्व प्रस्थापित करुन देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतील तर त्यात आश्चर्याचे कारण नाही.
-इंग्लिश यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर
जेम्स अँडरसनला विश्रांती की दुखापतीमुळे बाहेर?
इंग्लंडने अनुभवी जलद गोलंदाज जेम्स अँडरसन ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. वर्कलोड मॅनेजमेंट पॉलिसीनुसार त्याला न खेळवण्याचा निर्णय घेतला असल्याचे ईसीबीने जाहीर केले. मात्र, पोटरीच्या दुखापतीमुळे त्याला संघातून बाहेर व्हावे लागले असल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले.
ऍडलेडमध्ये गुलाबी चेंडूवरील दुसऱया कसोटीसाठी तो अधिक ताजातवाना राहू शकेल, अशी ईसीबीला तूर्तास अपेक्षा आहे. 2010-11 नंतर ऑस्ट्रेलियन भूमीत ऍशेस जिंकण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी इंग्लिश संघाला अँडरसन महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. दशकभरापूर्वी ऍन्डय़्रू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ऍशेस जिंकली, त्यावेळी अँडरसननेच 26.04 च्या सरासरीने 24 बळी घेत सिंहाचा वाटा उचलला होता.
बेन स्टोक्स पुनरागमनासाठी सज्ज
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स या लढतीच्या माध्यमातून प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करत असून येथील पहिल्या लढतीचे तोही मुख्य आकर्षण केंद्र ठरु शकेल. स्टोक्सने यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनिश्चित कालावधीकरिता ब्रेक घेतला होता.
कोट्स
ऑस्ट्रेलियन कसोटी इतिहासातील 47 वा कर्णधार बनण्याचा मान प्राप्त झाला, त्याचा मला विशेष आनंद आहे. डोनाल्ड ब्रॅडमन, रिची बेनॉ, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, मायकल क्लार्क, स्टीव्ह स्मिथ यांच्यासारख्या दिग्गजांच्या मांदियाळीत दाखल होणे हा मी माझा सन्मान मानतो. -ऑस्ट्रेलियाचा नूतन कसोटी कर्णधार पॅट कमिन्स









