सप उमेदवाराच्या बूथ एजंटला धमकाविल्याचा आरोप
उत्तरप्रदेशच्या प्रतापगड जिल्हय़ातील कुंडाचे आमदार आणि जनसत्ता दलाचे अध्यक्ष रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या बूथ एजंटने तक्रार केली आहे. कुंडा पोलीस स्थानकात नोंद एफआयआरनुसार सप एजंटने राजा भैय्या यांच्यावर जातिवाचक शिविगाळ, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. राजा भैय्या यांच्यासह 17 जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
कुंडा मतदारसंघात सपने गुलशन यादव यांना उमेदवारी दिली होती. रविवारी मतदानाच्या दिवशी सप आणि राजा भैय्या यांचे समर्थक अनेकदा आमने-सामने आले. त्यानंतर सपने निवडणूक आयोगाकडे कुंडामध्ये बनावट मतदान झाल्याची तक्रार केली होती. तसेच काही मतदान केंद्रांना ताब्यात घेण्यात आले होते असा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला.
पुंडा येथील मतदारांना राजा भैय्या यांच्या समर्थकांकडून धमकाविण्यात आल्याचा दावा सपने केला. जनसत्ता पक्ष आणि राजा भैय्या यांनी मतदारांना धमकाविले आहे. तसेच एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा दावा समाजवादी पक्षाने केला आहे.
प्रतापगडमध्ये सप उमेदवारावर हल्ला झाल्याचे म्हणत पक्षाने लखनौमध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल आणि राजेंद्र चौधरी यांनी आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.









