सोशल मीडिया वापराबाबत सावधानतेचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून हिजाबवरून बेळगावातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. सोशल मीडियावर प्रक्षोभक मॅसेज किंवा पोस्ट टाकण्याचे प्रकार घडत आहेत. अशाप्रकारे पोस्ट टाकणाऱयांवर मार्केट पोलीस स्थानकामध्ये दोघांवर आणि बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये एकावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी याबाबत एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापुढेही कोणीही अशाप्रकारे पोस्ट केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
शांतता भंग करू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, आतापर्यंत बेळगावच्या जनतेने शांतता बाळगली आहे. अशाचप्रकारे पुढेही सर्वांनी काळजीपूर्वक व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटर यांच्यावर कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक संदेश पाठवू नयेत, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिला आहे.
हिजाब काढण्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करा
उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार सर्व शिक्षण संस्थांनी वर्ग सुरू करावेत आणि विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे सरकारने याआधी एक पत्रक जारी केले होते. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना (कोणत्याही जाती, धर्माचे) भगवे स्कार्फ, स्कार्फ, हिजाब, धार्मिक झेंडे व तत्सम काहीही परिधान करण्यास मनाई केली होती. या अंतरिम आदेशानुसार हिजाब घालून येणाऱया विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश करण्यास मनाई असल्यामुळे हिजाब काढून वर्गात प्रवेश करण्यास सोयीचे व्हावे, यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करावी, अशी सूचना सर्व शाळा, कॉलेज, शिक्षण संस्थांना केली आहे.









