पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश
प्रतिनिधी / बेळगाव
उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या बेळगावसह राज्यातील पोलीस अधिकाऱयांना मुख्यमंत्र्यांचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले आहे. बेळगावचे पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱयांचा यामध्ये समावेश असून शुक्रवारी सकाळी बेंगळूर येथील विधानसौधमध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.

2017-18 सालासाठी जाहीर करण्यात आलेले मुख्यमंत्र्यांचे सुवर्णपदक शुक्रवारी प्रदान करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे लोकायुक्तच्या पोलीस प्रमुख यशोदा वंटगोडी, हुबळी रेल्वेचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, विजापूर येथील गांधी चौकचे पोलीस निरीक्षक रविंद्र नायकोडी, पीटीएस खानापूरमधील पोलीस निरीक्षक रमेश हुगार व हवालदार रमेश अक्की आदी अधिकारी व पोलिसांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
सध्या बेळगाव येथे सेवा बजावणारे व यापूर्वी बेळगावात सेवा बजावून इतर ठिकाणी बदल्या झालेल्या अनेक अधिकाऱयांचा या यादीत समावेश आहे.









