प्रतिनिधी/ बेळगाव
मुधोळ, जि. बागलकोट येथील एका पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा धास्तावली असून कोरोनापासून लोकांचा बचाव करण्यासाठी झटणाऱया पोलिसांनीही आता स्वतःची काळजी घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
मुधोळ येथील एका मदरशासमोर बंदोबस्तासाठी असलेल्या 39 वषीय पोलिसाच्या स्वॅब तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याला बागलकोट जिल्हा इस्पितळात दाखल केले असून बुधवारी दिवसभरात पोलीस दलात याची चर्चा होती. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता करता पोलीसही किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बेळगावात अनेक ठिकाणी लॉकडाऊनचा फज्जा उडविला जात आहे. कोरोनाच्या धास्तीने पोलिसांनी अडविणे व अनावश्यकपणे फिरणाऱयांना हटकणे सोडले तर परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर अडविणाऱया पोलिसांशी वाद घालत आम्ही याच मार्गावरून पुढे जाणार, अशी आडमुठी भूमिका अनेकजण घेताना दिसत आहेत.
पहिल्या दिवसापासून पोलीस अधिकारी कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी आहेत. संशयितांचा शोध घेण्याबरोबरच त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवणे, ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो, त्यांना विलगीकरण कक्षात हलविण्यास मदत करणे, याबरोबरच घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱया आरोग्य व आशा कार्यकर्त्यांना सुरक्षा पुरविणे, बाजारपेठेत बंदोबस्त ठेवणे, लॉकडाऊनचे पालन होत आहे की नाही पाहणे आदी कामांसाठी पोलीस सध्या रस्त्यावरच आहेत.
पोलिसांनी स्वतःची काळजी घेत सेवा बजावावी-सीमा लाटकर
पहाटे 5 पासून त्यांची सेवा सुरू होत आहे. लॉकडाऊनमुळे पोलीस दलाच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. बाजारपेठेतील दुकाने 5 वाजता उघडतात म्हणून पोलिसांनाही त्याचवेळी रस्त्यावर यावे लागत आहे. तरीही अनावश्यकपणे फिरणारी वाहने अडविली म्हणून पोलिसांच्या नावे शिव्याशाप दिल्या जातात. तर दुसरीकडे बंदोबस्तावरील पोलिसांच्या काळजीपोटी त्यांना चहा, नाश्ता देणारे सेवाभावी लोकही या काळात सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत मुधोळमधील पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याने बेळगावातही पोलीस धास्तावले आहेत. पोलिसांनी स्वतःची काळजी घेत सेवा बजावावी, अशी सूचना पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी केली आहे.









