उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले : 1 हजारांचा ठोठावला दंड
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱयांना लाठीमार केलेल्या पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशा मागणीची याचिका बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कोरोना काळात लाठीमार केलेल्या पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करून वकील बालकृष्णन यांनी जनहित याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा आणि न्या. एम. नागप्रसन्न यांच्या विभागीय पीठाने याचिका फेटाळली. तसेच याचिकाकर्ते वकील बालकृष्णन यांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
सुनावणीवेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले आहे. पोलिसांनी तोंडी सूचना केली तर लोक ऐकतात का?, आपल्या लोकांना नियमांबाबत जाणीव आहे का?, कोरोनामुळे किती पोलिसांचा मृत्यू झाला, याची माहिती आहे का?, असे प्रश्न न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना केले.
शिवाय पोलीस स्वखुशीने लाठीमार करत नाहीत. कोरोना नियंत्रणासाठी काम करणाऱया या पोलिसांना वेळेत अन्न-पाणी देखील मिळत नाही. तरीही ते जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. एक-दोन ठिकाणी पोलिसांनी कायद्याच्या चौकटीबाहेर कारवाई केली असेल, पण या कारणावरून सर्वच पोलिसांवर एफआयआर दाखल करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.









