प्रतिनिधी/ कराड
येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या जनावरे बाजारात शहर पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या म्हशी बांधण्यात आल्या आहेत. कायदेशीर बाब असल्याने ही जनावरे तेथे बांधलेली आहेत. मात्र या जनावरांची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने या जनावरांचे हाल होत आहेत. काही म्हशींचा मृत्यूही झाला असून याबाबत देखभाल करणाऱयांना सूचना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन जान फौंडेशनचे जावेद नायकवडी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहे.
शहर पोलिसांनी कारवाईवेळी म्हशी जप्त केल्या होत्या. या म्हशींची संख्या 28 होती. या म्हशी कायदेशीर बाब असल्याने पुढील आदेश होईपर्यंत शेती उत्पन्न बाजार समितीच्या जनावरे बाजारात बांधलेली आहेत. पोलिसांनी याबाबत बाजार समितीस सांगून म्हशी तेथे बांधल्या होत्या. मात्र त्यांची देखभाल व्यवस्थित होत नसल्याचे समोर आले आहे. 28 पैकी एका म्हशीचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 27 म्हशींची स्थिती खराब आहे. याबाबत निवेदन देऊन जान फौंडेशनने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सदर म्हशींची अवस्था पाहवत नाही. म्हशींच्या चारा-पाण्याची जबाबदारी कोणाकडे दिली असणार मात्र त्यांच्याकडून देखभाल व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत संबंधितांना सूचना किंवा समज देण्यात यावी. या प्रकरणी कारवाई करून मुक्या जनावरांच्या छळास प्रतिबंध करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.









