खडेबाजार रोडवरील घटना
प्रतिनिधी / बेळगाव
वाहतूक पोलिसांना चकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरून तिघेजण खाली पडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी खडेबाजार येथील शीतल हॉटेलजवळ घडला आहे.
खडेबाजार परिसरात दोघे वाहतूक पोलीस नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करीत होते. त्याचवेळी दुचाकीवरून ट्रिपल सीट आलेल्या तरुणांनी पोलिसांना पाहिले. त्यांना चकविण्याच्या प्रयत्नात असतानाच वाहतूक पोलिसाने दुचाकीवरील एका तरुणाचा हात धरल्यामुळे तिघेही दुचाकीवरून खाली पडले.
या प्रकारानंतर एकटा दुचाकी उचलत होता तर दुसरा पोलीस एका तरुणाला मारहाण करताना दिसत होता. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नागरिकांनी पोलिसांना जाब विचारला. ट्रिपल सीट आल्यामुळे त्यांनी नियम मोडला आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. त्याऐवजी दुचाकीवरून पडल्यानंतरही मारहाण का करता? असा जाब विचारला. नागरिकांनी हजेरी घेतल्यानंतरही आमचे काम आम्हाला करू द्या, असे सांगत पोलिसांनी तरुणांना आपल्यासोबत नेले. दुचाकीवरून आमच्या चुकीमुळे पडलो, त्याला पोलीस जबाबदार नाहीत, असे त्यांच्याकडून वदवून घेण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे. यासंबंधीचे 1 मिनिट 14 सेकंदांचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.
…तर त्याला कोण जबाबदार?
हॉटेलमध्ये जेवण आणण्यासाठी गेलेल्या एका दिव्यांग तरुणावर उद्यमबाग पोलिसांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच वाहतूक पोलिसांनीही दुचाकीवरून पडलेल्या तरुणांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांच्या भीतीने जर हे तरुण गंभीर जखमी झाले असते तर त्याला कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









