दोन मतदारसंघातील पोटनिवडणुकाच नव्हे तर विधानपरिषदेच्या चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. बिहारचा निकाल लागल्यानंतर कर्नाटकात नेतृत्व बदल होणार अशी आशा बाळगणाऱया येडियुराप्पा विरोधकांची या निकालाने चांगलीच पंचाईत झाली आहे.
कोरोना महामारीचा फैलाव आटोक्मयात आल्यानंतर कर्नाटकात प्रथमच तुमकूर जिह्यातील शिरा व बेंगळूर येथील आर. आर. नगर मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. खरेतर हे दोन्ही मतदारसंघ कधीच भाजपचे नव्हते. तेथून कधी काँग्रेस तर कधी निजद उमेदवार निवडून यायचे. दोन्ही मतदारसंघात वक्कलिग मतदारांचे वर्चस्व असल्यामुळे काँग्रेस आणि निजद या दोन्ही पक्षांनी त्याच समाजातील उमेदवारांना रिंगणात उतरविले होते. ऑपरेशन कमळच्या गळाला लागून काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मुनीरत्ना यांचा पराभव करण्यासाठी व्यापक प्रयत्न झाले. तरीही आर आर नगरमधून मुनीरत्ना विजयी झाले. लवकरच त्यांना मंत्रीपदही मिळणार आहे. आयएएस अधिकारी डी. के. रवी यांची पत्नी कुसुमा पराभूत झाल्या आहेत. शिरामध्ये भाजपचे डॉ. राजेशगौडा विजयी झाले आहेत. माजी मंत्री टी. बी. जयचंद्रा यांचा पराभव झाला आहे.
दोन मतदारसंघातील पोटनिवडणुकाच नव्हे तर विधानपरिषदेच्या चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. बिहारचा निकाल लागल्यानंतर कर्नाटकात नेतृत्व बदल होणार अशी आशा बाळगणाऱया येडियुराप्पा विरोधकांची या निकालाने चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण कर्नाटकात सत्ता टिकवायची असेल तर भाजपला येडियुराप्पा या नावाची गरज लागणार हे या निकालातून अधोरेखीत झाले आहे. विधानपरिषदेच्या चार व विधानसभेच्या दोन जागांवर भाजप विजयी झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांची खुंटी अधिक घट्ट झाली आहे. आपली खुंटी घट्ट करून येडियुराप्पा यांनी पक्षांतर्गत विरोधकांना चपराक दिली आहे. केवळ येडियुराप्पाच नव्हे तर त्यांचे चिरंजीव बी. वाय. विजयंद्रा यांना आवार घाला अशी मागणीही वाढली होती. या निवडणुकीत विजयंद्रा यांनीही महत्त्वाची भूमिका वठविली आहे. आर. आर. नगरमध्ये चित्रपटक्षेत्राशी निगडित असलेल्या मुनीरत्ना विजयी होणार असा कयास होता. शिरामध्ये मात्र कमळ फुलेल असा खुद्द मुख्यमंत्र्यांनाही विश्वास नव्हता. विजयंद्रा यांनी शिरामध्ये भाजपला विजय मिळवून दिला आहे.
या निकालाने काँग्रेसमध्येही हालचाली गतिमान झाल्या आहेत. डी. के. शिवकुमार यांच्यावर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे थोडेसे अंतर बाळगून आहेत. पुढच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुत मिळाले तर मुख्यमंत्री कोण होणार या मुद्दय़ावर पोटनिवडणुकीत बरीच चर्चा झाली. सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे सिद्धरामय्या समर्थकांनी प्रचार केला तर शिवकुमार समर्थकांनीही शिवकुमार हेच कर्नाटकाचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असा प्रचार केला. आर. आर. नगरमध्ये तर उमेदवार कुसुमा आहेत की शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश याचा विसर पडावा, अशी परिस्थिती होती. साहजिकच याचा फटका काँग्रेसला बसला. काँग्रेसपेक्षाही सर्वात मोठा फटका माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या निजदला बसला आहे. या दोन्ही मतदारसंघात वक्कलिग समाजाची मते निर्णायक आहेत. देवेगौडा आणि त्यांचे चिरंजीव कुमारस्वामी हे वक्कलिग समाजाचे निर्विवाद नेते आहेत, असा आजवरचा समज होता. या निवडणुकीत मतदारांनी तो समजही खोटा ठरविला आहे.
सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यातील अंतर्गत संघर्षाचा फटका या निवडणुकीत काँग्रेसला बसला. निजद तग धरू शकले नाही. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी मात्र व्यवस्थितपणे आपल्या उमेदवारांचा प्रचार करीत दोन्ही मतदारसंघात कमळ फुलविले आहे. आणखी अडीच वर्षे येडियुराप्पा यांना बदलता येणार नाही. जर नेतृत्व बदलाचा निर्णय घेतला तर त्याचे विपरीत परिणाम कर्नाटकात पक्ष संघटनेवर होणार आहेत, याचे संकेतच जणू या निवडणुकीतून मिळाले आहेत. या विजयानंतर कर्नाटक विधानसभेतील भाजपची संख्या बळ 118 वर पोहोचली आहे. पुढे बेळगाव लोकसभा, मस्की, बसवकल्याण विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुका होणार आहेत. त्या समोर असताना कर्नाटकात नेतृत्व बदलाचे प्रयत्न होणार आहेत हे स्पष्ट आहे. या निकालातून आणखी एक मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे तो म्हणजे येडियुराप्पा यांचे राजकीय वारसदार बी. वाय. विजयंद्र हेच आहेत.
विजयंद्रा यांच्या वेगावर नियंत्रण घालण्यासाठी भाजप आमदारांची मागणी वाढली होती. पोटनिवडणुकीतील विजयानंतर त्यांचा वेग आणखी वाढणार आहे. अतिवृष्टी, कोरोना महामारी, पूर परिस्थिती राज्य सरकारने व्यवस्थित हाताळली नाही, असा आरोप केला जात होता. काँग्रेसने तर निवडणूक प्रचारात याच मुद्दय़ांवर भर दिला होता. तरीही मतदारांनी दोन्ही मतदारसंघात कमळ फुलविले आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱया आमदारांची बैठकही झाली आहे. रमेश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी इच्छुकांची बैठक झाली आहे. बिहारचा निकाल आणि पोटनिवडणुकीनंतर विस्तार होणार अशी अटकळ होती. आता भाजपचे राष्ट्रीय नेते बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या घाईत आहेत. त्यामुळे बिहारमध्ये नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतरच कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराला चालना मिळणार आहे. विस्तारापेक्षा मंत्रिमंडळाची पुनर्रचना करा, अशी मागणी माजी मंत्री एच. विश्वनाथ यांनी केली आहे. ते स्वतः मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. निजद प्रदेश अध्यक्षपदाला रामराम ठोकून भाजपावासी झालेल्या विश्वनाथ यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. मंत्रिमंडळ विस्तार किंवा पुनर्रचना करणेही तेवढे सोपे नाही. कारण मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. ज्यांना पद मिळत नाही ते बंडाचा झेंडा फडकवणार हे सध्या तरी स्पष्ट आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पुनर्रचना करणे येडियुराप्पा यांच्यासाठी एक अग्निपरीक्षाच ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या वाढत्या वर्चस्वामुळे प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वालाच सुरूंग लागला आहे. काँग्रेसने पक्षांतर्गत लाथाळय़ा संपविल्या नाहीत तर कर्नाटकात काँग्रेसची वाटचाल आणखी खडतर होणार हे निश्चित आहे.








