पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यातील गाठीभेटींमुळे चर्चा रंगली
संजीव खाडे/कोल्हापूर
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली नसली तरी पडद्यामागून राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप विरूद्ध महाविकास आघाडीतील काँग्रेस अशी लढत सध्या तरी होणार असे दिसत असले तरी मैत्रीपूर्ण लढतीसाठी शिवसेना आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱयात बेकफास्ट, लंच आणि डिनरच्या निमित्ताने शिवसेनेबराबर काँग्रेस नेत्यांच्या घेतलेल्या गाठीभेठींमुळे राजकीय चर्चा रंगू लागली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत उत्तरमध्ये पाया रोवू द्यायचा नाही, या निर्णयापर्यंत महाविकास आघाडी आली असून त्या करिता ऐनवेळी माजी आमदार मालोजीराजे यांच्यासारखा बडा उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या दृष्टीनेही गंभीरपणे विचार सुरू झाला आहे. मालोजीराजे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपतीही पर्याय होऊ शकतात, अशी नवी राजकीय जुळवणी सुरू झाली आहे.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपसह महाविकास आघाडीतील काँग्रेसमध्ये हालचाली आणि राजकीय जुळवाजुळव सुरू आहे. भाजपने सत्यजित कदम यांची उमेदवारी निश्चित केल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसकडून जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेनेही कोल्हापूर उत्तर आपला बालेकिल्ला आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी देण्याची मागणी पक्ष नेतृत्वाकडे करत रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतील स्थानिक नेते, पदाधिकारीही या निमित्ताने एकत्रित आले आहेत. त्यांना खासदार संजय मंडलिक यांचे बळ मिळत आहे. शिवसेनेच्या एकजूट आणि आग्रही मागणीमागेही जिल्हा बँक, गोकुळचे आणि भविष्यातील महापालिका निवडणुकीचेही संदर्भ आहेत. त्यामुळे काँग्रेसबरोबर वाहून न जाता बरोबरीने जाण्याच्या दृष्टीने शिवसेनेत मतप्रवाह पुढे आला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या भविष्यातील राजकीय अस्तित्वासाठी पोटनिवडणूक काँग्रेसऐवढीच महत्वाची आहे. पोटनिवडणुकीत काँग्रेस जिंकली तर यापुढे कायम काँग्रेसचा क्लेम उत्तरवर राहणार, भाजप जिंकला तर भाजपचा पाया तयार होणार आणि शिवसेना रिकामी राहणार ही भीती क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिकांना आहे. त्यातून मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह वेग पकडत आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱयात सेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘कोल्हापूर उत्तर’ची परंपरा आणि इतिहास सांगत मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह धरला आहे.
काँग्रेसच्या गोटात सर्व शक्यतांची चाचपणी
आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी नवीन राजवाडय़ावर जाऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आर्शीवादही घेतले. यावेळी माजी आमदार युवराज मालोजीराजे छत्रपती, त्यांच्या पत्नी सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सदस्य उपस्थित होते. मालोजीराजे आणि मधुरिमाराजे या आदित्य ठाकरे यांच्याबरोबर वेस्टर्न इंडिया फुटबाॉल असोसिएशनवर (व्हिफा) काम करत आहेत. त्यामुळे ते फुटबॉल विकासाच्या निमित्ताने एकत्रित येत असतात. शिक्षणासंदर्भातही त्यांच्या चर्चा होत असते. त्यामुळे नवीन राजवाडय़ावरील ठाकरेंच्या भेटीला वेगळे महत्व आहे. नजीकच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार निवडीवेळी या भेटीचा प्रभाव पडू शकतो.
भाजपला रोखण्यासाठी मालोजीराजे ऐनवेळी रिंगणात
राज्य पातळीवर सध्या महाविकास आघाडी विरूद्ध भाजप यांच्या राजकीय आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यांच्यातील संबंधही ताणले जात आहेत. त्यामुळे ‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यातून कोणत्याही स्थिती भाजपला पोटनिवडणूकीच्या निमित्ताने ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये पाय रोवू द्यायचे नाहीत, यावर महाविकास आघाडीत एकमत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेची समजूत घालून काँग्रेसचा प्रबळ उमेदवार देण्याच्या दृष्टीनेही काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. त्यातून ऐनवेळी राजकीय संदर्भ बदलत गेल्यास मालोजीराजे यांना कोल्हापूर उत्तरच्या रिंगणात उतरविण्याच्या दृष्टीने काँग्रेसने तयारी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या भेटीच्या निमित्ताने काँग्रेसने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मालोजीराजे यांच्याबरोबरीने मधुरिमाराजे यांचाही पर्याय काँग्रेसने तयार ठेवला आहे. बदलत्या राजकीय स्थितीत काँग्रेस धक्कादायक निर्णय घेऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राजकीय सर्व्हेंचाही प्रभाव
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीआधी काँग्रेस, शिवसेनेसह भाजपनेही खासगी कंपन्यांकडून सर्व्हे करून घेतले आहेत. स्थिती बदलेल तसा सर्व्हे केला जात आहे. त्यात कोण पुढे?, कोण मागे?, इतर छोटे पक्ष रिंगणात असल्यास होणारा परिणाम याचाही राजकीय पक्षांचे नेते अभ्यास करत आहेत. त्यातून उमेदवार बदलणे, मते खाणारा, विरोधकांना उपद्रवी ठरणारा उमेदवार उभे करण्याचेही राजकारण होणार आहे.