ज्येष्ट साहित्यिक उत्तम कांबळे, प्रसिद्ध कवी सागर काकडे यांची खास उपस्थिती

प्रतिनिधी /पेडणे
शेतकरी सभागृह, पेडणे येथे तिसऱया ‘फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार’ साहित्य संमेलनाचे आज शनिवार दि. 11 रोजी आयोजन केले आहे. शाहू प्रतिष्ठान इब्रामपूर, नवचेतना युवक संघ पेडणे, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान पेडणे आणि कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन केले आहे.
स.9. वा. पेडणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ापासून संमेलन स्थळापर्यंत संविधान दिंडी काढण्यात येणार आहे. स. 10 वा. उद्घाटन सोहळय़ात उद्घाटक या नात्याने उपमुख्यमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर उपस्थित असतील तर संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे उपस्थित असणार आहेत. उत्तम कांबळे यांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले.
पुणे येथील प्रसिद्ध कवी सागर काकडे यांची कवी संमेलनाला अध्यक्ष या नात्याने उपस्थिती असेल. आतापर्यंत महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील महत्त्वाचे समजले जाणारे तब्बल 55 पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांनी अनेक संमेलनांमध्ये कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे.
या साहित्य संमेलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शाहू प्रतिष्ठान इब्रामपूर संस्थेचे संस्थापक परेश परवार यांनी केले.









