पेट्रोल-डिझेल एक ते दीड रुपयान महागणार : सरकारला दरमहा मिळणार 5 कोटी महसूल
प्रतिनिधी / पणजी
राज्यात लॉकडाऊन चालू असतानाच सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयाद्वारे पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट करात 21 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत अशी चार टक्के वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर 1 ते 1.50 रुपयांनी वाढणार आहेत. या वाढीव दरांमुळे सरकारला प्रत्यक्षात पूर्ण वाहतूक सुरू झाल्यानंतर दरमहा सुमारे 5 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त होईल.
राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईला आल्याने अचानकपणे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन कालावधी चालू आहे. त्यामुळे केवळ सरकारी आणि अवघीच काही खाजगी वाहने रस्त्यावर दिसतात. परिणामी पेट्रोल आणि डिझेलला फारशी मागणी नाही. अशावेळी हीच संधी साधून सरकारने अचानकपणे पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट करात 4 टक्के वाढ करून सर्वांना धक्काच दिलेला आहे.
महाराष्ट्र, कर्नाटकच्या तुलनेत कमीच
यासंदर्भात एका सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, व्हॅट जरी 21 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढलेला असला तरी देखील शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या मानाने तो कमीच आहे.
पेट्रोलचे दर एक ते दीड रुपयाने वाढणार
राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी 3 मे रोजी समाप्त होणार असून तत्पूर्वी दि. 20 एप्रिलपासून अंशतः काही वाहने सुरू होतील असा अंदाज आहे. त्यानंतरच राज्य सरकारला खऱया अर्थाने पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त महसूल प्राप्त होईल. या अतिरिक्त दरवाढीने राज्यात पेट्रोलचे दर आता 1 ते 1.50 रुपयाने वाढणार आहे. सर्वसामान्य वाहनधारकांना त्याचा तीव्र फटका बसणार आहे.
राज्याची आर्थिक स्थिती फारच खालावल्याने सध्या सरकार दरमहा रु. 200 कोटी सार्वजनिक कर्ज घेत आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील दरवाढीमुळे वर्षाकाठी सरकारला सुमारे 60 कोटी रुपये अतिरिक्त महसूल प्राप्त होईल.









