वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरस महामारीला तोंड देण्यासाठी भारतीय पॅरा ऑलिंपिक समितीने दिल्ली शासनाला 500 सुरक्षा किटस्ची मदत दिली आहे. शनिवारी दिल्ली शासनाकडे हे पीपीई किटस् सोपविण्यात आले.
कोरोना महामारीमुळे आतापर्यंत देशात बळींची संख्या किमान 800 झाली असून संपूर्ण जगभरात दोन लाखापेक्षा अधिक व्यक्ती मरण पावल्या आहेत. या महामारीला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय 3 मे पर्यंत घेतला आहे. देशाच्या राजधानीत कोरोनाचा प्रसार अधिक वाढत असल्याने दिल्ली शासनाकडून सर्व नियमाचे पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. भारतीय पॅरा ऑलिंपिक समितीतर्फे दिल्ली शासनाकडे 500 सुरक्षा किटस् सोपविण्यात आले असून सोमवारी केंद्रीय शासनाला 1000 सुरक्षा किटस् दिले जाणार असल्याची माहिती या समितीचे सरचिटणीस गुरूशरण सिंग यांनी दिली. भारतीय पॅरा ऑलिंपिक समितीतर्फे शनिवारी हे सुरक्षा किटस् आपचे राज्यसभेतील खासदार एन.डी. गुप्ता यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्याचप्रमाणे भारतीय पॅरा ऑलिंपिक समितीच्या कर्मचाऱयांनी आपला एक दिवसाचा पगार कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी गेल्या महिन्यात पंतप्रधान निधीला दिला होता.









