वृत्तसंस्था/ मेलबोर्न
भारतीय कसोटी क्रिकेट संघातील मध्यफळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या 2018-19 सालातील मालिकेत जबरदस्त कामगिरीचा धसका ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी घेतला आहे. येत्या उन्हाळी मौसमात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचे प्रमुख लक्ष पुजाराच्या फलंदाजीवर राहील.
2018-19 साली झालेल्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला होता. या मालिकेत पुजाराची फलंदाजी चांगलीच बहरली होती. चेतेश्वर पुजाराने या मालिकेत चार कसोटीत 74.42 धावांच्या सरासरीने तीन शतके आणि एक अर्धशतकांसह 521 धावा झोडपल्या होत्या. पुजाराने या मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची मर्यादा उघडी केली होती. आता भारताच्या या आगामी ऑस्ट्रेलियन दौऱयात पुजाराकडून दमदार फलंदाजीला आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाज आतापासून विविध डावपेच आखत आहेत. पुजाराच्या फलंदाजीच्या क्षमतेबाबत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अधिक विचार करावा लागत आहे.
पुजाराला लवकर बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी यापूर्वीच्या मालिकेत खूपच प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत. पुजाराच्या फलंदाजीत काही त्रुटी असू शकतात, त्याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल, असेही कमिन्सने म्हटले आहे.
चेंडूवर नजर बसल्यानंतर पुजाराला बाद करणे खूपच अवघड असल्याची कबुली त्याने दिली आहे. खेळपट्टीवर टिच्चून अधिक वेळ राहण्याची प्रचंड क्षमता पुजारामध्ये असल्याने तो यशस्वी करत आहे. आगामी मालिकेत पुजाराला लवकर कसे बाद करता येईल याचे औषध मिळविण्याचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा प्रयत्न राहील. 2018-19 च्या मालिकेतून आपल्याला बरेच काही शिकता आले, असे 27 वर्षीय कमिन्सने म्हटले आहे.
स्वत:च्या गोलंदाजीमध्ये कशी सुधारणा करता येईल याचा विचार प्रत्येक ऑस्ट्रेलियन गोलंदाजांला करावा लागला आहे. ही मालिका झाल्यानंतर आपण 10 ते 15 कसोटी सामने खेळले असून प्रत्येक कसोटी सामन्यानंतर गोलंदाजीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा प्रयत्न बऱयाच प्रमाणात यशस्वी ठरल्याचे कमिन्सने म्हटले आहे. गेल्या दौऱयाच्या तुलनेत या आगामी दौऱयात ऑस्ट्रेलियन संघ भारतीय संघाला चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वास कमिन्सने व्यक्त केला आहे.









