पहिल्या दिवशी मिळाला उत्तम प्रतिसाद
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शुक्रवारपासून जिल्हय़ात पूर्ण क्षमतेने एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. एकीकडे प्रतिसाद मिळणार नाही, असे वाटत असतानाच पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 50 हजाराच्या वर प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती रत्नागिरी विभागाकडे सायंकाळपर्यंत जमा झाली होती. त्यामुळे टप्याटप्याने आणखीन बसेस वाढवण्यात येणार असून सध्या 230 गाडय़ा सुरू आहेत. यातील 60 गाडय़ा या परजिल्हय़ात जाणाऱया असल्याची माहिती रत्नागिरी विभागाने दिली.
जिल्हय़ात 1 सप्टेंबरपासून लॉकडाऊन संपल्यापासून 230 गाडय़ा सुरू करण्यात आल्या, मात्र सुरूवातीला अल्प प्रतिसाद मिळत होता. आता हा प्रतिसाद वाढला असून गुरूवारी चक्क दिवसभरात 51 हजार प्रवाशांनी सोशल डिस्टंन्सिग ठेवून प्रवास केला असून शुक्रवारपासून तर पूर्ण क्षमतेने प्रवास सुरू करण्यात आल्याने प्रवासी संख्या जवळपास 50 हजाराच्या वर गेली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येनुसार या गाडय़ा आता दररोज वाढवण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या आधी दररोज 700 गाडय़ा सोडल्या जात होत्या. यामध्ये 150 गाडय़ा या जिल्हय़ाबाहेर जाणाऱया होत्या तर 550 गाडय़ा रत्नागिरी जिल्हय़ात प्रवासी वाहतूक करणाऱया होत्या. आता वेळापत्रक पूर्वीप्रमाणे होण्यास थोडा कालावधी लागणार असून प्रवासी पूर्ण क्षमतेने नेताना प्रवाशांनी योग्य काळजी घेतल्यास कोरोनापासून लांब राहता येईल, असे एस.टी महामंडळाने म्हटले आहे. त्यामुळे शुक्रवारी नवीन जादा गाडय़ा वाढवण्यात आल्या नसल्या तरी आहे त्या 230 गाडय़ांना उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रवाशांची सविस्तर आकडेवारी रात्री उशीरा विभागाकडे जमा होते. त्यामुळे आता एस.टी.ला उत्पन्न वाढीसाठी चांगली मदत होणार आहे. एस.टी.वर नेहमीच प्रवाशांनी विश्वास दाखवला आहे. या विश्वासार्हतेवर आज एसटीही तितकीच चांगली सेवा प्रवाशांना देत असल्याची माहिती एसटी विभागाने दिली.









