चिखली, आंबेवाडी, कळे, बाजारभोगाव, वाघवे, म्हाकवे येथे मदतकार्य
प्रतिनिधी / कोल्हापूर:
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जिह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विविध ठिकाणी रस्ते बंद झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये आंबेवाडी,चिखली, बाजारभोगाव, कळे, वाघवे, म्हाकवे या ठिकाणी मदतकार्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके बोटीसह गुरुवारी सकाळी दाखल झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके कार्यरत आहेत.
मुसळधार पावसाने पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठल्याने सुरक्षितेच्या कारणास्तव 25 जवानांचे पथक करवीर तालुक्यातील आंबेवाडी व चिखली या ठिकाणी दाखल झाले. या ठिकाणी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शितल मुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर बाजार भोगाव (ता. पन्हाळा) आजारी व वयस्कर नागरीकांना बाहेर काढण्यासाठी पाच जणांचे पथक दाखल झाले. या शिवाय कळे (ता. पन्हाळा) येथे रस्ता बंद झाल्याने दक्षता म्हणून या ठिकाणी पाच जणांचे पथक, करंजफेण (ता. शाहुवाडी) येथे संपर्क तुटल्याने 25 लोकांना बाहेर काढण्यासाठी 17 जणांचे पथक, वाघवे (ता. पन्हाळा) येथे माकडे अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी 8 जणांचे पथक, म्हाकवे (ता. कागल) येथे रस्ता बंद झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव 9 जणांचे पथक दाखल झाले आहे. आवश्यक त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांकडून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.









