जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचे आवाहन : बैठकीत अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या काही वर्षांमध्ये अतिवृष्टी होऊन जिल्हय़ामध्ये काही ठिकाणी पुराचा फटका बसत आहे. नदीकाठावरील गावांना अधिक फटका बसत असून त्या पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबत आताच विचार करावा. पुराचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी आणि आपत्ती निवारण प्राधिकारचे अध्यक्ष एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत. यंदा पाऊस सामान्य असणार आहे. तरीदेखील पावसापासून येणाऱया पुराची तयारी आतापासूनच केली पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये पुरामुळे मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्रातही अधिक पाऊस झाला तर जिल्हय़ातील कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा या नद्यांना अधिक पाणी येते. त्यामुळे अनेक गावांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे आताच त्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
आपत्ती निवारण करण्यासाठी मार्गदर्शन पुस्तिका तयार करावी. त्यामध्ये कशा प्रकारे पुराचे निवारण करावे, याबाबतची माहिती द्यावी. ती पुस्तिका सर्व तालुक्मयातील अधिकाऱयांना पाठवावी, असे सांगण्यात आले. मागीलवेळी परिहार केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. त्या ठिकाणी यावर्षीही अशा केंद्रांची निर्मिती करण्यासाठी सर्व तयारी ठेवा, असे त्यांनी सांगितले. नदीकाठावर बोटींची व्यवस्था करावी, याचबरोबर कंट्रोल रूमची निर्मिती करणेही गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
पुराच्या काळात जनावरांना चारा मिळणे कठीण होत असते. नदीकाठावरील गावे स्थलांतरीत केल्यानंतर त्या कुटुंबाचे तसेच जनावरांचे हाल होवू नयेत, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातून येणाऱया पाण्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातून पाणी अधिक प्रमाणात येत असल्यास नदीकाठावरील गावांचे स्थलांतर करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पाऊल टाकावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, चिकोडीचे प्रांताधिकारी मुकेशकुमार, मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
पावसाळय़ापूर्वी धोकादायक झाडे हटवा
गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. झाडे कोसळत आहेत. तेव्हा पावसाळय़ापूर्वी धोकादायक झाडे काढून वीजपुरवठा सुरळीत करावा, असे जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सांगितले. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनीही यावेळी सूचना केल्या.









