भारतीय मुष्टियुद्धासाठी देखील शनिवारचा दिवस अतिशय निराशाजनक ठरला. पूजा राणीला 75 किलोग्रॅम वजनगटात तर अमित पांघलला 52 किलोग्रॅम वजनगटात पराभव पत्करावे लागले.
माजी वर्ल्ड चॅम्पियन व रिओ ऑलिम्पिक कांस्यजेती क्वियानने उपांत्यपूर्व फेरीत पूजा राणीवर सातत्याने वर्चस्व गाजवले. राणीला रिंगमध्ये प्रारंभी थोडा स्पार्क दाखवल्यानंतर अजिबात सूर सापडला नाही आणि दडपण झुगारुन खेळण्याचे तिचे अनेक प्रयत्न देखील निष्फळ ठरले. पदार्पणाची ऑलिम्पिक खेळत असलेल्या पूजा राणीला बचावातील त्रुटींची पराभवाच्या रुपाने मोठी किंमत मोजावी लागली.
पुरुष गटात अमित पांघल पहिल्याच फेरीत पराभूत होणे आणखी वेदना देणारे ठरले. त्याला रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यजेता युबेर्जेन मार्टिनेझने 4-1 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. मार्टिनेझने अमितवर सातत्याने हल्ले चढवले आणि यातून सावरण्यातच पांघलचा वेळ आणि ताकद जास्त प्रमाणात खर्ची पडली.

पदकासाठी भारताच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या अमितला कोलंबियन मार्टिनेझने पहिल्या तीन मिनिटात जेरीस आणले होते. मार्टिनेझचा वेगवान खेळ येथे निर्णायक ठरला. मार्टिनेझने नंतर उत्तरार्धात देखील वर्चस्वाची मालिका कायम राखताना आपली आगेकूच कायम ठेवली. अमितने इनसाईड थांबण्यावर अधिक भर दिला. या प्रयत्नात त्याचा सावध पवित्र्यावर अधिक भर राहिला आणि याचा पुरेपूर लाभ घेत मार्टिनेझने बाजी मारली.
अर्थात, या पराभवानंतर देखील 25 वर्षीय पांघल हाच अलीकडील कालावधीत भारतीय मुष्टियुद्धातील सर्वात यशस्वी मुष्टियोद्धा ठरतो. त्याने 2018 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण व त्यानंतर 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. लष्करी सेवेत असलेला अमित तीनवेळचा आशियाई विजेता देखील आहे. मात्र, येथे शनिवारी मार्टिनेझविरुद्ध त्याची फारशी मात्रा चालली नाही. यापूर्वी रिओ 2016 ऑलिम्पिकमध्ये लाईट फ्लायवेटचे रौप्य जिंकणारा मार्टिनेझ आता टोकियो ऑलिम्पिकनंतर व्यावसायिक मुष्टियुद्धात पदार्पण करणार आहे.









