पोलीस-सीआरपीएफ नाका पथकावर दहशतवाद्यांचा गाळीबार
श्रीनगर / वृत्तसंस्था
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिह्यात दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त नाका पथकावर रविवारी हल्ला केला. या हल्ल्यात एक एएसआय (सहायक उप-निरीक्षक) हुतात्मा झाले. दहशतवाद्यांनी पेलेल्या गोळीबारानंतर एएसआय जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. हुतात्मा एएसआय विनोद कुमार हे उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिह्यातील रहिवासी आहेत. तसेच मंडुना येथील रहिवासी नजीर अहमद कुचे हे क्रॉस फायरिंगमध्ये जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोड बथुरा क्रॉसिंगजवळील नाका पॉईंटवर हा हल्ला झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाचे अतिरिक्त पथक घटनास्थळी पोहोचले. पथकांनी आजूबाजूच्या परिसराची नाकेबंदी केली. मात्र, हल्लेखोर सापडू शकले नाहीत.
अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवाद्यांनी या महिन्यात दुसऱयांदा सुरक्षा दलांवर हल्ला केला. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिह्यात रविवारी दुपारी सीआरपीएफच्या नाका केंद्रावर गोळीबार केला. दुपारी 2.20 च्या सुमारास दहशतवाद्यांनी गंगू परिसरात तैनात असलेल्या नाका केंद्राला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये घटनास्थळी उपस्थित असलेले सीआरपीएफच्या 182 बटालियनचे एएसआय विनोद कुमार गंभीर जखमी झाले. ते रक्ताच्या थारोळय़ात जमिनीवर कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले. या घटनेनंतर लगेचच हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराची नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इतर सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सैनिकांकडून हल्लेखोरांची माहिती घेतली. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.
सुरक्षा दलांवर यापूर्वीही हल्ला
अमरनाथ यात्रा सुरू झाल्यापासून या महिन्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर दोनदा हल्ले केले आहेत. या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले तर दोन जवान आणि एक नागरिक जखमी झाले. 12 जुलै रोजी श्रीनगरच्या लाल बाजार भागात पोलिसांच्या नाका पॉईंटवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस एएसआय मुश्ताक अहमद हुतात्मा झाले होते.