प्रतिनिधी/ बेळगाव
सांबरा एअरफोर्सच्या अधिकाऱयांना क्वॉर्टर्स बांधण्यासाठी 1942 मध्ये मुतगा येथील शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून घेण्यात आल्या होत्या. जमीनी घेतल्या मात्र अजूनही त्याची रक्कम देण्यास केंद्र आणि राज्य सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकऱयांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने अनेकवेळा शेतकऱयांची रक्कम देण्याचे आदेश देवून देखील सरकारने टाळाटाळ केली. त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयाचे साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने बजावले. त्या आदेशानुसार न्यायालयाचे कर्मचारी आणि वकील जप्त करण्यासाठी गेले असता प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकाऱयांनी पुन्हा न्यायालयात धाव घेवून मुदत घेतली आहे.
सांबरा येथील एअरफोर्ससाठी मुतगा गावातील शेतकऱयांच्या 30 एकर 30 गुंठे आणि 4 एकर जमीन घेण्यात आली होती. 30 एकर जमिनीचे 3 करोड 83 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. याचबरोबर दुसऱया 4 एकर जमीनीचे 53 लाख द्यावे, असा आदेश बजावण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश बजावला आहे. याबाबत अनेकवेळा प्रांताधिकाऱयांना ती रक्कम भरण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. मात्र केवळ मुदत मागून वेळ मारुन नेण्यात आली होती.
शुक्रवारी जप्तीचे आदेश घेवूनच न्यायालयीन कर्मचारी प्रांताधिकारी कार्यालयात हजर झाले. खुर्च्या देखील जप्त केल्या. मात्र आम्हाला वेळ वाढवून द्या, आम्ही तुमची रक्कम देवू, असे प्रांताधिकारी व त्यांच्या सहाय्यकांनी सांगितले. मात्र शेतकरी व त्यांचे वकील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे खुर्च्या जप्त केल्या. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकाऱयांनी चौथे अतिरिक्त दिवाणी न्यायालयात धाव घेतली आणि आम्हाला रक्कम देण्यासाठी वेळ वाढवून द्या, अशी मागणी केली.
न्यायाधीशांनी 24 सप्टेंबरपर्यंत पैसे जमा करण्यासाठी अवधी दिला आहे. त्यामुळे जप्तीची कारवाई थांबविण्यात आली आहे. एकूणच शेतकऱयांच्या जमिनी घेवून 80 वर्षे उलटली तरी शेतकऱयांचे पैसे दिले जात नाही. यामुळे शेतकऱयांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शेतकऱयांच्यावतीने ऍड. आप्पासाहेब वामनराव सदरजोशी यांनी काम पाहिले आहे. यावेळी त्यांनीही नाराजी व्यक्त केली. शेतकऱयांच्या सुपीक जमीनी ताब्यात घेतल्यामुळे शेतकरी भूमीहीन झाले आहेत. जवळपास एका खटल्यामध्ये 728 शेतकरी आहेत तर आणखी एका खटल्यामध्ये 60 शेतकरी आहेत. या शेतकऱयांच्या कुटुंबियांना रक्कम मिळत नसल्यामुळे त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.









