वार्ताहर / हरमल
कोविड 19 ने जगात वातावरण ढवळून निघाले आहे. नोकऱया गेल्या, व्यवसाय रोखले, वाहतूक ठप्प व असंख्य लोक घराकडील ओढीने हवालदिल झाले आहेत. पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या पत्नी व पुत्राला, गोव्यात वडिलांकडे व मूळ घरी यायला निघालेल्या माता-पुत्रास कोल्हापूर हुन पुन्हा माघारी पाठविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गोव्यातील तिची वृद्ध माता तसेच दिर-भावजया,भाऊ व नातेवाईक प्रचंड मानसीक तणावाखाली असून त्यांच्या आगमनाकडे डोळे लागून राहिले असल्याचे समजते. पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या गोव्यातील एक कुटुंबाची ह्रदयद्रावक कहाणी.सध्या पुणे शहराच्या काही भागात रेड झोन आहे, सुदैवाने त्यांचा परिसर ग्रीन झोन असल्याने घराची ओढ लागली आहे. कोविडमुळे देशात लॉकडाऊन असल्याने कुटुंबातील वडील लॉकडाऊन पूर्वीच गोव्यात घराच्या बारीकसारीक कामांसाठी आले होते.त्याच सुमारास कोविडने कहर केल्याने कर्फ्यू,लॉकडाऊन जारी झाले. एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्याने पुण्याहून पत्रादेवीपर्यत येण्यास त्याना परमिट मिळाले होते.फोंडाघाट भागांतील चेकनाक्मयावर गोवा प्रवेशाचे परमिट दाखवण्याचे आवाहन अधिकाऱयांनी केले असता, त्यानी ऑनलाइन अर्ज केला असून त्याची प्रत अद्याप मिळाली नसल्याचे त्यानी सांगितले. आम्हांस पत्रादेवीपर्यत जाण्यास अनुमती द्यावी तोपर्यंत परमिट मिळेल असे सांगूनही त्या अधिकाऱयाने त्याना परमिट नसल्याच्या कारणास्तव माघारी पुण्यात पाठविल्याचे, त्यांनी संतापयुक्त सुरांत नाराजी व्यक्त केली.
जेव्हा पणजी जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन अर्ज केला असता,मातेच्या आधारकार्डच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबप्रमुखाने सांगितले.मातेच्या आधारकार्डवर पुण्यातील पत्ता असल्याचे कारण कार्यालयातून सांगण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार,सदर माता पुण्यात शिक्षिका असल्याने गोव्यात नोंदणी असलेले आधारकार्डपत्ता त्यांच्यापाशी नाही.मात्र, वडील व पुत्राचे आधारकार्ड,पत्ता गोवा नोंदणीकृत आहे.मातेचा जन्मदाखला,विवाह नोंदणी दाखला व अन्य, गोव्यातीलच आहे.आधारकार्ड व पत्त्यामुळे त्याना गोव्यात प्रवेश मिळणे कठीण बनले आहे.पेडणे उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱया मारून थकलेल्या त्या वडिलांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी संपर्क साधला व कल्पना दिली.कोल्हापूरपर्यत आलेल्या माता-पुत्राला घरची व पती-वडिलांच्या तसेच वृद्ध आईच्या भेटीची ओढ होती.तिची वृद्ध आई प्रचंड मानसिक तणावाखाली गेली असून कोल्हापूरपर्यत आलेल्या लेकीला व नातवाला भेटण्याचा योग कधी नशिबी आहे असा सवाल ती माता आपल्या लेकीला करीत आहे. मात्र सरकारी लालफितीतील कारभार आडवा आल्याने कुटुंबाची ताटातूट झाली.संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली असल्याने गोव्यातील उच्चपदस्थांनी ह्याकडे लक्ष देण्याची मागणी त्या पुत्राच्या वडिलांनी केली आहे.
सरकारचा कारभार म्हणजे ’आंधळा दळतो कुत्रा पीठ खातो,अशी स्थिती आहे.कोविडबाधित ड्रायव्हर व अन्य लोकांना गोव्यात प्रवेश दिला जातो, मात्र निरोगी गोमंतकीय लोकांना परमिटसाठी थांबावे लागते हा अजब न्याय चालू आहे.फक्त आधारकार्ड हा सर्वसामान्य लोकांसाठी ग्राह्य दाखला मानला, त्या व्यतिरिक्त लोकांकडून अन्य कसलाच दाखला वापरला नाही असा त्यांचा अर्थ होतो.मात्र अनेक लोकांनी परमिटसाठी आधारकार्ड वापरलेच नसल्याचे खात्रीपूर्वक समजते.
तरी ह्या गंभीर काळात सरकारने काही घटकांचा व आवश्यक आधारकार्ड व्यतिरिक्त अन्य दाखल्यांचा किंवा आमदारांच्या शिफारशी ग्राह्य मानून व सहानुभूतीने विचार करून गोमंतकीयाना त्यांच्या मूळगावी परतण्याची मुभा द्यावी व आशिर्वाद प्राप्त करावेत अशी मागणी त्यांच्या कुटुंबियातून केली जात आहे.









