ऑनलाईन टीम / पुणे :
शिक्षण मंडळाच्या उधळपट्टीच्या कारभाराचा कित्ता महापालिकेत नव्याने स्थापन झालेल्या शिक्षण समितीनेही गिरविण्यास सुरुवात केली आहे. शिक्षण समितीने उधळपट्टीची प्रथा पुढे सुरु ठेवत असल्याचे निदर्शनास आले असून सदर प्रकार गंभीर असल्याने शिक्षण समिती बरखास्त करावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पतित पावन संघटना पुणे शहर तर्फे देण्यात आला आहे.
शिक्षण समिती बरखास्त करावी, याबाबतचे निवेदन संघटनेचे पुणे शहर प्रवक्ते स्वप्नील नाईक यांनी पुणे मनपा आयुक्तांना दिले आहे. तसेच पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापौर, शिक्षण आयुक्त, विरोधी पक्ष नेता, गटनेते आणि भाजपा शहराध्यक्षांना देखील निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
स्वप्नील नाईक म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. ज्या शाळेत गोरगरीबांची मुले शिक्षण घेतात, तेथील त्रुटी दूर करण्याचे सोडून स्वत:च्या अलिशान कार्यालयांसाठी व इतर गोष्टींसाठी लाखोंचा खर्च शिक्षण समितीतर्फे होत असेल, तर त्याला संघटनेचे विरोध आहे. अजून समितीची कारभाराला देखील सुरळीतपणे सुरुवात झाली नाही. तर, लगेचच गैरप्रकार प्रकरणे समोर यायला सुरुवात झाली आहे. हा प्रकार गंभीर असून शिक्षण समिती बरखास्त करण्याची मागणी आम्ही करीत आहोत. अन्यथा याविरोधात आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.








